उल्हासनगर : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या वालधूनी आणि उल्हास नदींचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या नद्यांमध्ये केमिकल टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणावर विषारी रसायने सोडली जात असल्याने नद्यांचे पाणी घातक बनले आहे. परिणामी या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. ५ जानेवारीपासून एमआयडीसी परिसरात केमिकल टँकरची संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत हालचाल पूर्णपणे थांबवली जाणार आहे.
वनशक्ती या एनजीओच्या सततच्या पाठपुराव्यानंतर वालधुनी आणि उल्हास नदीच्या प्रदूषणाचा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाने नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली एमआयडीसीत केमिकल टँकरच्या हालचालींवर मर्यादा घालण्यात आली आहे.
येत्या ५ जानेवारीपासून अंबरनाथ, बदलापूर व डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात दररोज संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत १२ तासांसाठी केमिकल टँकरची प्रवेशबंदी लागू केली जाईल. जर या आदेशाचे उल्लंघन करून टँकर या क्षेत्रात दिसले, तर संबंधितांवर पोलीस विभागाकडून गुन्हा दाखल केला जाईल आणि कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. या नद्यांच्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या विषारी वायूंमुळे अनेक रहिवाशांना श्वसनाचे त्रास होतात.
ठाणे पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय साधून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केमिकल टँकरमुळे होणाऱ्या प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, केवळ बंदी पुरेशी नसून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. प्रदूषणमुक्त परिसर तयार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नद्यांच्या आरोग्याचे संवर्धन करावे.
- मीना मकवाना, उपायुक्त विशेष शाखा ठाणे पोलीस