ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कँडल मार्चनंतर पोलिसांच्या कारवाईवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आणि थर्ड डिग्रीचा वापर केल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
हत्येला महिना उलटूनही मुख्य सूत्रधारांना अटक झालेली नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काढलेल्या कँडल मार्चमध्ये १५ ते २० हजार नागरिक सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असतानाही दगडफेकीच्या घटनेच्या नावाखाली सामान्य तरुणांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पूर्णेकर यांनी केला.
ताब्यातील एका तरुणाने बंद खोलीत काठ्यांनी मारहाण केल्याचा, तर दुसऱ्याने साध्या वेशातील व्यक्तींनी दगडफेकीबाबत पैशांची विचारणा केल्याचा दावा केला. काही तरुणांशी अपमानास्पद वर्तन केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.
दगडफेक करणाऱ्यांची नावे आणि व्हिडीओ पुरावे देण्याची तयारी असल्याचे सांगत, आंदोलनातील तरुणांना लक्ष्य करू नये, असे पूर्णेकर म्हणाले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास संपूर्ण प्रकार स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दगडफेकीच्या व्हिडीओमध्ये राजा शिंदे याच्यासोबत दिसणाऱ्या दाढीधारी व्यक्तीचाही राम पूर्णेकर यांनी उल्लेख केला.