उल्हासनगर : जेव्हा शब्द निष्क्रिय ठरतात, तेव्हा कृती झणझणीत उत्तर देते! जागतिक जलदिनी कुणी भाषणं देतात, तर कुणी पोस्टर लावतात. पण काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या सगळ्यावर मात करत, स्वतःचे मुंडन करून थेट दूषित उल्हास नदीत उतरून आंदोलनाचा धगधगता एल्गार पुकारला आहे. जलपर्णीच्या विळख्यात अडकलेल्या आणि रसायनांनी भरलेल्या जलात उभे राहून सुरू झालेले हे बेमुदत आंदोलन शासनाच्या दुर्लक्षाविरुद्ध आक्रोश ठरत आहे.
आम्ही किती वेळा सांगायचे? किती आंदोलने करायची? असा संतप्त सवाल करत ‘उल्हास- वालधुनी नदी संवर्धन संघटना’, ‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्था, माजी नगरसेवक नितीन निकम, उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी शनिवारी मोहोने नाल्याजवळ उल्हास नदीत उतरून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली. आम्हीच दूषित पाणी पिऊन जगावे, आणि दुसऱ्यांना ते वळवावे, हा अन्याय आहे. जर काही द्यायचेच असेल, तर स्वच्छ पाणी द्या! अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या. हे आंदोलन केवळ नदीसाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक दिवस नदीत उभे राहून होणार आंदोलन
प्रत्येक दिवशी सकाळी आंदोलनकर्ते जलपर्णी आणि केमिकलयुक्त पाण्यात थेट उभे राहणार आहेत. या प्रतीकात्मक नव्हे तर
व्यावहारिक आंदोलनामुळे शासनाला वेळीच जाग यावी, ही आंदोलनकर्त्यांची अपेक्षा आहे.
प्रशासनाकडून पोकळ आश्वासने
गेल्या आठ वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाण्याच्या लाखो लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आंदोलनांची मालिकाच सुरू आहे. मात्र, शासन आणि प्रशासनाकडून केवळ तोंडी व लेखी आश्वासनांची पोकळ आश्वासने मिळाली. या पोकळपणाविरोधात जलदिनासारख्या पवित्र दिवशी आंदोलनकर्त्यांनी स्वतःचे मुंडन करून जलपर्णी आणि गाळाने भरलेल्या उल्हास नदीच्या पाण्यात उतरून बेमुदत संघर्षाचा नवा अध्याय सुरू केला आहे.