उल्हासनगर महानगरपालिका संग्रहित छायाचित्र
ठाणे

Ulhasnagar : बोगस डॉक्टरांना अभय कुणाचे? १८ गुन्हे दाखल; काहींना अटकही, तर अनेक दवाखान्यांवर कारवाई नाहीच

उल्हासनगर शहरातील कथित बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेने मोठ्या गाजावाजात कारवाई करत १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले, तर काहींना अटकही करण्यात आली. मात्र, वर्षभर उलटल्यानंतरही अनेक संशयित डॉक्टरांचे दवाखाने बिनधास्त सुरू असल्याचे वास्तव समोर आल्याने संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवनीत बऱ्हाटे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कथित बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेने मोठ्या गाजावाजात कारवाई करत १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले, तर काहींना अटकही करण्यात आली. मात्र, वर्षभर उलटल्यानंतरही अनेक संशयित डॉक्टरांचे दवाखाने बिनधास्त सुरू असल्याचे वास्तव समोर आल्याने संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या कथित बोगस डॉक्टरांना नेमके संरक्षण कुणाचे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उल्हासनगर महापालिका आणि आरोग्य विभागाने मागील वर्षी शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या २६ संशयित डॉक्टरांची चौकशी सुरू केली होती. मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना किंवा वादग्रस्त व अमान्य पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय केल्याचा संशय व्यक्त करत जून २०२५ मध्ये तब्बल १८ कथित बोगस डॉक्टरांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका जागरूक डॉक्टरने सातत्याने पाठपुरावा करत माहिती अधिकारातून कागदपत्रे मिळवून तक्रारी केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली होती.

कारवाईनंतर दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची गती मंदावल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हे दाखल झालेल्या अनेक डॉक्टरांचे दवाखाने आजही सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने पत्राद्वारे महापालिकेला दिली होती. तरीही संबंधितांवर कोणतीही कठोर प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलीस विभागाने या प्रकरणांमध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तपास प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक अहवाल आणि पूरक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्यात महापालिका व संबंधित विभागांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील हजारो नागरिकांच्या जीवाशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणात विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव उघड झाला असून, कारवाईचा केवळ दिखावा करण्यात आला की दोषींना जाणीवपूर्वक अभय दिले जात आहे, असा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या संवेदनशील प्रकरणात दोषींवर कठोर आणि निर्णायक कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

शहरातील कथित बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यापक तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे दवाखाने तत्काळ सील करून त्यांच्याविरोधात नव्याने गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. यापूर्वी अशा दवाखान्यांवर सील कारवाई करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही आणि कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल.
धीरज चव्हाण, अतिरिक्त आयुक्त महापालिका

बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार; विद्यार्थ्याविरुद्ध होणार कारवाई, CET कक्षाचा निर्णय

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या बसेस; BEST समितीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी

Mumbai : सभागृहातील आवाज होणार खणखणीत; ध्वनियंत्रणा बदलणार, माइक उचलाउचली बंद