उल्हासनगर : शहाड रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर 'शहाड' ऐवजी 'शहद' असा शब्द दिसल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले. त्यांनी ही चूक गंभीर मानली आणि पदाधिकाऱ्यांना ताबडतोब लिखित निवेदन देण्याचे आदेश दिले. तसेच सुधारणा न झाल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन होईल, असा इशारा दिला.
शुक्रवारी अंबरनाथ दौऱ्यावरून परतताना राज ठाकरे यांचा ताफा शहाड स्थानकाजवळ थांबला. स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले, परंतु स्टेशनबाहेरील बोर्डावरील 'शहद' हा शब्द - पाहताच राज ठाकरे संतापले. उल्हासनगर मनसे अध्यक्ष संजय घुगे यांनी सांगितले की, ही रेल्वे प्रशासनाची निष्काळजी असून आधीही याकडे लक्ष वेधले गेले होते.
प्रशासनाचे आश्वासन
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून 'शहद' शब्द काढून योग्य 'शहाड' लिहिण्याची लिखित मागणी केली. अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा कडक इशारा दिला. स्थानिक नागरिकांनीही या चुकीवर रोष व्यक्त केला असून शहाडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला गालबोट लावणारी ही चूक लाजिरवाणी असल्याचे सांगितले. आता मनसेच्या अल्टिमेटमनंतर रेल्वे प्रशासन किती तत्परतेने दुरुस्ती करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.