रूपाली चाकणकर संग्रहित छायाचित्र
ठाणे

शहापूर शाळा प्रकरण : मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - रूपाली चाकणकर

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

Swapnil S

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

शहापूरच्या शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी शहापूर मध्ये पालकांची भेट घेतली. पालकांचे म्हणणे तसेच शिक्षण विभाग, पोलीस तपासाचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, शिक्षणाधिकारी यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समिती केवळ रजिस्टर नोंद असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

या गंभीर घटनेतील आरोपी मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आले आहे. तपासणीनंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र मान्यता रद्द झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तेव्हा सोमवारपासून स्वतंत्रपणे पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अपमानजनक शारीरिक तपासणीला सामोरे गेलेल्या मुलींच्या मानसिकतेचा विचार करून सर्व मुलींचे बाल कल्याण समितीकडून समुपदेशन करण्यात यावे, असेही चाकणकर यांनी प्रशासनास सांगितले.

पोलिसांना निर्देश

८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जण अटकेत आहेत. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित ३ जणांची पोलीस चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन विश्वस्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र इतर दोन विश्वस्त यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पालकांनी याआधी घडलेल्या काही घटना उजेडात आणल्या. याबाबत पोलीस, पालक, शिक्षण विभाग यांची बैठक घेऊन पालकांच्या तक्रारी जाणून घेत सखोल तपास करावा, अशा सूचना चाकणकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश

Mumbai : नव्या विकासकावर जुन्या विकासकाची देणी लादणे बेकायदा; उच्च न्यायालयाचा निर्णय, महारेराचा आदेश रद्द

देशभरात ६० हजार कोटींची सुवर्ण उलाढाल; सोने खरेदीच्या उत्साहाने धनत्रयाेदशी साजरी

OBC क्रिमिलेअरसाठी पगार, कृषी उत्पन्न आधार नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का