शिवसेनेने भाजपला दाखवला 'कात्रजचा घाट'; अडचणीच्या नऊ जागा देत धोबीपछाड 
ठाणे

Thane Election : शिवसेनेने भाजपला दाखवला 'कात्रजचा घाट'; अडचणीच्या नऊ जागा देत धोबीपछाड

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून हे चित्र स्पष्ट झाले असून, ज्या ठिकाणी भाजपचा प्रभाव नगण्य आहे अशा मुंब्रा व कळवा परिसरातील तब्बल नऊ जागा भाजपच्या वाट्याला आल्याने शिवसेनेने भाजपला निकालाआधीच धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत ताणून धरलेल्या भाजपला शिवसेना (शिंदे गट) ने अखेर जागावाटपात ‘कात्रजचा घाट’ दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून हे चित्र स्पष्ट झाले असून, ज्या ठिकाणी भाजपचा प्रभाव नगण्य आहे अशा मुंब्रा व कळवा परिसरातील तब्बल नऊ जागा भाजपच्या वाट्याला आल्याने शिवसेनेने भाजपला निकालाआधीच धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून तिढा सुटत नव्हता. भाजपच्या हट्टामुळे शिवसेनेच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र होते. युती तुटते की काय, अशीही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या क्षणी युती जाहीर झाली. ठाण्यात शिंदे सेनेला ८७, भाजपला ४० आणि मुंब्रा विकास आघाडीला ४ जागा असे समीकरण ठरले असले, तरी भाजपच्या वाट्याला आलेल्या ४० पैकी मुंब्रा व कळव्यातील ९ जागा प्रत्यक्षात ‘असून नसल्यासारख्या’ असल्याची चर्चा आहे. या भागांत भाजपचा मतदाराधार कमकुवत असल्याने या जागा जिंकणे भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

युतीच्या जागावाटपावर भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रात्री युती जाहीर झाली. मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपने ५५ जागांची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र सरतेशेवटी केवळ ४० जागांवर समाधान मानावे लागले.

एकूणच, ठाण्यातील जागावाटपात शिवसेनेने वरचढ डाव खेळत भाजपला अडचणीच्या जागांवर समाधान मानायला लावल्याचे चित्र असून, याचे पडसाद निवडणूक निकालात कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा; ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

चांदी जैसा रंग, सोने जैसा भाव...; मूल्य, परताव्याबाबत २०२५ मध्ये चांदीच ठरली सरस

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी