नामदेव शेलार / मुरबाड :
पावसाळ्यातील जुलै महिन्यात रानभाज्या तसेच वळगणीचे मासे, चिंबोरी, मुठेंवर ताव मारणाऱ्या खवय्यांनी गटारी अमावस्या साजरी करण्याची तयारी सुरू केली आहे.
येत्या वर्षीची गटारी जोषात करण्यासाठीचे नियोजन महिन्यापासूनच सुरू करण्यात आले होते. यासाठी महिनाभरापासून फार्म हाऊस, बंगलो, पर्यटन स्थळातील रहिवासी लॉज, हॉटेल बुकिंग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गत वर्षापेक्षा यंदा हॉटेल, लॉजिंगवाल्यांनी आपल्या भाड्यामध्ये वाढ केल्याची चर्चा आहे. गटारी साजरी करणाऱ्यांनी मुरबाडला अधिक पसंती दिल्याने मुरबाडमधील हॉटेल, लॉजिंग यांची ऑनलाइन बुकिंग झाल्याने अनेकांना माळशेज घाट, नाणेघाट परिसरातील नदी, नाले, ओढ्याचा आनंद लुटता येणार आहे.
गटारी अमावस्यानिमित्त यावर्षी गावठी कोंबड्यांना अधिक मागणी असल्याने पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे चिकन विक्रेत्यांनी सांगितले ग्रामीण भागातील गावठी कोंबडे ५०० ते ७०० रुपयांना विक्री होणारे कोंबडे गटारीच्या तोंडावर १००० ते १२००० रुपयाला मिळत आहेत. खवय्यांचे बकरे, मेंढ्यांच्या मटणाला अधिक पसंती मिळत असल्याने मटणाची आधीच बुकिंग झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र समुद्रात मासेमारीला बंदी असल्याने पापलेट, कोळंबी, सुरमई या मच्छी बाजारात येत नसल्याने डॅम धरणाची गावठी मच्छी तेलप्पा, करला, माशांना भाव मिळत आहे. ८० रुपये किलो असणारे मासे दोनशे रुपये किलोच्या भावाने विक्री होत आहेत, गटारी अमावास्याला त्याचे भाव अधिक भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गटारीला मटण-मच्छीसोबत दारू, सिगारेट, गुटखा आणि ठंडा यांनाही अधिक मागणी आहे. गटारी अमावस्यानिमित्ताने गावठी, देशी-विदेशी बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. बनावट दारूपासून खवय्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत प्रत्येक हॉटेल, लॉजिंगवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गटारीनिमित्त खवय्यांनी मासे, चिकन व मटण यांवर आपले लक्ष वळविले आहे. तसेच गावरान कोंबडीचे दर वाढले असतानाही बॉयलर तसेच गावठी कोंबड्या उत्पादकांच्या कुक्कुटपालनासह चिकन सेंटरवर गर्दी होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
ग्राहकांची प्रचंड मागणी आणि वाढलेल्या दरामुळे गावरान कुक्कुटपालन व्यवसायिकांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तसेच अंड्यांची सुद्धा मागणी वाढली आहे.