ठाणे : एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात दर सोमवारी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. यापूर्वी दर बुधवारी पाणीकपात करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता दर सोमवारी पाणीकपात होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २ नोव्हेंबरपासून होणार आहे.
ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात हा बदल करण्यात आला आहे. याबाबत २८ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. दर महिन्याच्या बुधवारी होणाऱ्या शटडाऊनऐवजी प्रत्येक सोमवारी शटडाऊन घेऊन पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राज्य शासनाने एल-निनोच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि प्राधान्यक्रमाने व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध वितरण करणे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
या भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
प्रत्येक सोमवारी होणाऱ्या १० टक्के पाणीकपातीचा परिणाम घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.