ठाणे : हवामान बदल आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झाडे कोसळण्याच्या घटनांनी चिंतेत भर घातली आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत ठाणे महापालिका हद्दीत तब्बल ६४९ झाडे कोसळली, तर २७१ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.
ही आकडेवारी केवळ अतिवृष्टीचा परिणाम नसून, शहरातील वृक्ष संवर्धन, शहरी नियोजन आणि मनपाच्या वृक्ष व्यवस्थापनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे. याच कालावधीत झाडे आणि फांद्या मिळून एकूण ९२० घटना नोंदविण्यात आल्या. त्यामुळे या घटनांकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील पर्यावरणीय आणि मानवनिर्मित कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, झाडे केवळ मुसळधार पावसामुळे कोसळत नाहीत. शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर विकासकामांदरम्यान बुंध्याभोवती मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे मुळांना हवा, पाणी आणि नैसर्गिक विस्तार मिळत नाही.
झाडे पडण्याच्या घटनांकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहून चालणार नाही. झाडांच्या आरोग्याकडे, मुळांच्या संरक्षणाकडे आणि वैज्ञानिक वृक्ष व्यवस्थापनाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास अशा घटना वाढत राहतील. आता वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याची गरज आहे.डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक