ठाणे

आदिवासी वाड्यांवरील महिलांचा पाणी प्रश्न सुटला

नवशक्ती Web Desk

(ओंकार पातकर)

शहापूर शहाराजवळून वाहणाऱ्या भातसा धरणाच्या उजव्या तीर कालव्यातून शेतकऱ्यांच्या उन्हाळी भातपिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील विहिरी व बोअरिंगची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणारअसल्याने आदिवासी नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आदिवासी पाड्यात छोट्या पाणी योजना राबवण्याचा ठराव शहापूर नगरपंचायतने मान्य केल्यामुळे आदिवासी वाड्यांमध्ये मुबलक पाणी मिळणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या मोसमात आदिवासी वाड्यांवरील महिलांचा पाणी प्रश्न सुटला.

शहापूर शहरालगत असलेल्या व माहुली किल्ल्यातून उगम पावणाऱ्या भारंगी नदीचे पाणी डिसेंबरमध्येच आटत असल्याने शहापूर परिसरातील विहिरी, बोअरिंगच्या पाण्याची पातळी देखील दरवर्षी खालावलेली असते. यंदा मात्र भातसा धरणातून शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहापूर व भिवंडी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या कालव्यातील पाण्याचा फायदा आजूबाजूच्या विहिरी व बोअरिंगला झाला असून त्यांची पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शहापूर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी मागील मासिक बैठकीत पाण्याची पातळी, विहिरी व बोअरिंगवर नवीन छोट्या स्वरूपाच्या पाणी योजना आणण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती प्रभाग क्रमांक १२ चे शिवसेना नगरसेवक रणजित भोईर यांनी दिली. या पाणी योजनेमध्ये ५ एचपीची मोटार विहीर अथवा बोअरिंगला बसवून त्याद्वारे परिसरातील ७० ते ८० घरांना वापरण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.

"शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१ मधील खानशेत येथील आदिवासी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तेथे छोट्या स्वरूपात पाण्याची टाकी बसविण्यात आली असून यामाध्यमातून पाणी योजना सुरू करण्यात आली आहे, यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे."

- गीता मिलिंद भोईर, नगरसेविका, नगरपंचायत शहापूर

"सध्या भातसा धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी पुन्हा चार दिवसांनी सोडण्यात आले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबत परिसरातील पाण्याच्या पातळीवर देखील होणार आहे."

- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा धरण विभाग

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस