ठाणे : ठाणे शहरात दिव्यांगांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांच्या कल्याणासाठी आणि सुविधांसाठी ठाणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विविध सोयीसुविधा, उपचार, अनुदान आणि सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद दिव्यांग फाऊंडेशन’ या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यास नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
ही संस्था कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यात येणार असून, ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर काम करणार आहे. पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन फाऊंडेशन’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ही योजना आखली आहे. महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना वेळेवर आणि सुसंगत सेवा देण्यात अडथळे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर उपचार, शैक्षणिक सुविधा, सवलती आणि इतर मदत वेळेत व योग्य प्रकारे मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय, विविध विषयांतील तज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती वेळोवेळी संचालक मंडळास मार्गदर्शन करेल. संस्थेच्या निर्णयप्रक्रियेमध्ये दिव्यांगांसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि व्यावसायिकांचा समावेश घेण्यात येणार आहे, जेणेकरून सेवा अधिक व्यापक आणि प्रभावी बनतील. ही संस्था स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून महापालिकेकडून अनुदान स्वरूपात निधी प्राप्त करेल आणि त्या माध्यमातून दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करेल.
संस्थेत आठ सदस्यांचा समावेश
ही संस्था स्वतंत्र अस्तित्व असलेली असल्यामुळे तिच्या दैनंदिन कामकाजात महापालिकेचा हस्तक्षेप मर्यादित राहणार असून, संस्था स्वतःच्या निर्णयाने कार्यवाही करू शकेल. त्यामुळे अकार्यक्षमता कमी होऊन अधिक परिणामकारक सेवा पुरवता येणार आहेत. याशिवाय, या संस्थेला आयकरातून सवलत आणि CSR (Corporate Social Responsibility) निधी मिळवणेही अधिक सोपे होणार आहे. संस्थेच्या संचालक मंडळात आठ सदस्यांचा समावेश असणार आहे. अध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्त, उपाध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त-२, तसेच समाज विकास उपायुक्त, समाज विकास अधिकारी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेता सदस्य म्हणून असतील.
उल्हासनगरमध्ये दिव्यांगांचा हक्कासाठी पावसात संघर्ष
उल्हासनगर : भर पावसात अंग ओले होत असतानाही आवाजात आक्रोश आणि डोळ्यांत ठामपणा... अशा निर्धाराने शेकडो दिव्यांग बांधवांनी उल्हासनगर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला. शासनाने २०१६ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना जीआरद्वारे निर्देश दिले होते की दिव्यांगांना बाजारपेठांमध्ये २०० चौरस फूट जागा स्टॉलसाठी द्यावी. मात्र उल्हासनगर महापालिकेने याची अंमलबजावणी न करता याआधी लावलेले स्टॉल्स देखील हटवले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक दिव्यांग कल्याण योजना केवळ कागदावरच मर्यादित असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली.
दिव्यांग व्यक्तींना स्टॉल देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील एका महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. - धीरज चव्हाण (अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महापालिका)