ठाणे

Thane : महापौरपद नाही तर उपमहापौरपदही नको; भाजपची भूमिका स्पष्ट

ठाणे महापालिकेत युतीत लढलेल्या शिंदेसेनेला ७५ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही भाजपने दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली होती.

Swapnil S

ठाणे : महापौरपद मिळत नसेल तर उपमहापौर पदही नको, अशी ठाम भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये आता नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

भाजपने दोन वर्षांसाठी महापौरपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र शिंदे सेनेने महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला असून, उपमहापौर पद देण्याची तयारी दर्शविली आहे. तरीदेखील महापौरपद मिळत नसेल तर केवळ उपमहापौरपद स्वीकारण्याऐवजी स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समित्या, शिक्षण मंडळ आणि प्रभाग समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे.

या सर्व घडामोडींवर अंतिम निर्णय काय होणार, याचे चित्र शुक्रवारी सकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेत युतीत लढलेल्या शिंदेसेनेला ७५ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही भाजपने दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली होती. मात्र महापौरपद एकही वर्ष देण्यात येणार नसल्याचे शिंदेसेनेने भाजपच्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदेसेनेने भाजपला उपमहापौरपद देण्याचा प्रस्ताव ठेवला असून, विषय समित्या व प्रभाग समित्यांचे वाटप तीन आणि दोन वर्षे अशा पद्धतीने दोन्ही पक्षांकडे राहील, असा प्रस्तावही देण्यात आल्याचे भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र महापौरपद नसेल तर उपमहापौरपदही नको, अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.

अन्यथा वेगळा विचार…

महापौरपद मिळत नसल्याने भाजपने स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ, विषय समित्या आणि प्रभाग समित्यांवर दावा केला आहे. मात्र या वाटपातही समाधानकारक हिस्सा मिळाला नाही, तर भाजप वेगळा राजकीय विचार करू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी काही ज्येष्ठ नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत विरोधी बाकावर बसण्याचा पर्यायही चर्चेत आल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या नव्या मागण्या

महापौरपदाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपने आता स्थायी समिती आणि परिवहन समिती किमान एक वर्षासाठी द्याव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच विषय समित्या व प्रभाग समित्यांचे पाच वर्षांसाठी आलटून-पालटून वाटप व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षण मंडळावरही भाजपने दावा ठोकला आहे.

आज करणार अर्ज दाखल

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवार, ३० जानेवारी रोजी अर्ज दाखल केले जाणार आहेत. जर भाजपने उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला नाही, तर त्या पदावर शिंदेसेना स्वतःचाच नगरसेवक देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमहापौरपद भाजपला देण्याची तयारी शिंदे सेनेने दर्शविली आहे.

Mumbai : भाजप व शिंदे सेनेची मदार दादांच्या तीन नगरसेवकांवर; दोन्ही पक्षनेतृत्वाकडून मोर्चेबांधणी

आरसीएफ वायू गळतीबद्दल वृत्तपत्रे, न्यायिक अधिकारी खोटे बोलतात का? हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

BMC चा दणका! १,१८९ बांधकामांना कामबंद नोटीस; सेन्सर्स न बसवणे पडले महागात

मुंबई, नवी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समिती; पालिकांच्या कारभारावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

NCP च्या दोन गटांत रस्सीखेच! सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी; तर विलिनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही