ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन  
ठाणे

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन

कर्करोगाविरुद्धची लढाई आता नागरिकांच्या दारी पोहोचली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाची अत्याधुनिक ‘कॅन्सर व्हॅन’ संपूर्ण ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्यात फिरणार आहे.

Swapnil S

ठाणे : कर्करोगाविरुद्धची लढाई आता नागरिकांच्या दारी पोहोचली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाची अत्याधुनिक ‘कॅन्सर व्हॅन’ संपूर्ण ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्यात फिरणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ ते ११ ऑगस्टदरम्यान नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे मोफत स्क्रीनिंग, जनजागृती आणि आवश्यक तपासण्या करण्यात येत आहेत. कर्करोगाचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सध्या ही व्हॅन ऐरोली येथील राजमाता जिजाऊ जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. येथे तोंडाच्या कर्करोगासाठी ओरल स्क्रीनिंग, संशयास्पद जखम किंवा गाठ आढळल्यास ओरल बायोप्सी, तसेच महिलांसाठी स्तनाची क्लिनिकल तपासणी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मिअर चाचणी करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. माधवी इंगळे, डॉ. शोभना चव्हाण, डॉ. अर्चना पवार, डॉ. अशफाक सिद्दीकी यांच्यासह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात १२ ते २१ ऑगस्टदरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात, तर तिसऱ्या टप्प्यात २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान उल्हासनगर महापालिका क्षेत्रात कॅन्सर व्हॅनद्वारे तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या व्हॅनमध्ये प्रशिक्षित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांची तपासणी करून कर्करोगाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः तंबाखू, गुटखा किंवा धूम्रपान करणारे तसेच ३० वर्षांवरील महिला-पुरुषांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा.
डॉ. अर्चना पवार, दंत शल्यचिकित्सक
कर्करोग हा लपवण्याचा नव्हे, तर वेळेत ओळखून उपचार करण्याचा आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास तो नियंत्रणात आणता येतो. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता मोफत तपासणीचा लाभ घ्यावा.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

व्याजदर यंदाही स्थिरच; एल निनो, युद्धामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाईची धास्ती

'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!

माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला काळे फासू; राष्ट्रवादीचा काँग्रेसला गंभीर इशारा

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?