ठाणे : शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कोपरी वाहतूक शाखेत स्थानिक नागरिक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि नागरिकांच्या सहभागाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोपरी परिसर हा पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे रेल्वे स्थानक, पूर्वेकडील बस स्थानक तसेच विविध उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त संध्या भिसे तसेच कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देण्यात आले.
बारा बंगला परिसरातील वाहतूककोंडी, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षांचे व्यवस्थापन, बेशिस्त आणि अवैध पार्किंग तसेच वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. यावर वाहतूक पोलिसांनी अनधिकृत पार्किंगविरोधात सातत्याने कारवाई केली जात असून, वाहतूक शिस्त राखण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येत असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक समस्यांच्या निराकरणासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व सहकार्य आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती वाढवून परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कोपरी वाहतूक शाखेप्रमाणेच शहरातील इतर वाहतूक विभागांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवून तक्रार निवारणाची यंत्रणा उभारल्यास ठाणेकरांना खऱ्या अर्थाने वाहतूककोंडीमुक्त आणि सुकर प्रवासाचा आनंद घेता येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अनधिकृत पार्किंगमध्ये वाहन उभे असल्याचे आढळल्यास नागरिकांनी छायाचित्रासह माहिती ८६५५६५४१७६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी. संबंधित तक्रारीची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.दिलीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरी वाहतूक शाखा
कोपरीचा पॅटर्न ठाण्यात राबविण्याची गरज
ठाण्यातील इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी होत असते, अशा भागांमध्येही कोपरीप्रमाणे स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील अनेक भागांत बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी, नागरिकांना प्रवासाचे नियोजन करतानाही अनेकदा विचार करावा लागत आहे.