डिजिटल वर्गांचा दिखावा नको! ठाणे महापालिका शाळांतील डिजिटल शिक्षणावर नगरसेवकांवर तीव्र आक्षेप 
ठाणे

डिजिटल वर्गांचा दिखावा नको! ठाणे महापालिका शाळांतील डिजिटल शिक्षणावर नगरसेवकांवर तीव्र आक्षेप

महापालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी आधी बसवलेले डिजिटल बोर्ड बंद, वायफाय गायब, सीसीटीव्ही बंद आणि शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचा धक्कादायक मुद्दा महासभेत समोर आला.

Swapnil S

ठाणे : महापालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी आधी बसवलेले डिजिटल बोर्ड बंद, वायफाय गायब, सीसीटीव्ही बंद आणि शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचा धक्कादायक मुद्दा महासभेत समोर आला. त्यामुळे नवीन डिजिटल वर्गांच्या नावाखाली केवळ खर्चाचा खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. डिजिटल बोर्ड बसविण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष अध्यापनासाठी किती उपयोग होणार, याचा हिशोब प्रशासनाने द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

शिंदे सेनेचे नगरसवेक सुधीर कोकाटे यांनी थेट शाळांच्या मालकीचा मुद्दा उपस्थित केला. “ज्या शाळा महापालिकेच्या नावावरच नाहीत, त्या शाळांमध्ये डिजिटल वर्ग करून काय साध्य होणार?” असा सवाल त्यांनी केला. महसूल नोंदी आणि महापालिकेच्या नोंदी यामध्ये तफावत असल्याने आधी शाळांची मालकी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. राजेश मोरे यांनी डिजिटल बोर्डवर नेमके काय शिकवले जाणार, असा सवाल करत केवळ तंत्रज्ञानाचा दिखावा नको, असे सुनावले. इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे का, शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे का, याची माहिती प्रशासनाने द्यावी. शिक्षणपद्धतीत बदल होत असताना काही देशांत डिजिटल वर्गांचा वापर कमी केला जात असल्याचा दाखला देत, “आपल्याकडे डिजिटल बोर्ड लावून नेमके शिकवणार काय?” असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नगरसेविका मर्जीया पठाण यांनी या आधी आलेल्या ४५५ डिजिटल वर्गांचा हिशोब मागितला. त्यापैकी किती वर्ग आजही सुरू आहेत, किती बंद आहेत, याची माहिती प्रशासनाने घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला. मालती भोईर यांनी काही शाळांमध्ये डिजिटल बोर्ड असूनही वायफाय बंद असल्याचा आरोप केला.

गुणवत्ता वाढणार कधी?

सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनीही डिजिटल शिक्षणाबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेतली. या पूर्वी १८२ डिजिटल वर्ग झाले असून आणखी ७० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत. मात्र,पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना डिजिटल सुविधांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत किती भर पडते, याचा आढावा घेऊन शाळांच्या मालकीच्या नोंदीही तपासण्याची मागणी केली. ज्या शाळा पालिकेच्या नावावर नाहीत, त्या महापालिकेच्या मालकीच्या करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

४५० विद्यार्थ्यांना चार शिक्षक

बाबाजी पाटील यांनी शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला घेरले. शाळा क्रमांक ८१ आणि २६ मध्ये सुमारे ४५० विद्यार्थी आणि केवळ चार शिक्षक असल्याचे सांगितले. शिक्षकच अपुरे असताना डिजिटल वर्गांचा उपक्रम कसा राबवणार, असा सवाल त्यांनी केला. साक्षी मढवी यांनी दिवा भागात दहावीपर्यंतची एकही महापालिका शाळा नसल्याकडे लक्ष वेधले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव

Mumbai : गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप; तीन हजार लिटर कलरचे वितरण