ठाण्यात रंगले ‘बॅनर’ युद्ध छायाचित्र : दीपक कुरकुंडे
ठाणे

Thane Election : ठाण्यात रंगले 'बॅनर' युद्ध; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; विकास विरुद्ध असंतोष

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराला जोर चढला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील बॅनर युद्ध ठाण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शहरभर झळकणाऱ्या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापत चालले आहे.

Swapnil S

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराला जोर चढला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील बॅनर युद्ध ठाण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शहरभर झळकणाऱ्या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापत चालले आहे. स्वतंत्र बॅनरमुळे युतीतील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, त्यानंतर संयुक्त होर्डिंगच्या माध्यमातून महायुती एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि प्रचारात एकत्रित प्रतिमा पुढे यावी, या उद्देशानेच बॅनरबाजी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

'नमो भारत, नमो ठाणे'

ठाण्यात सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपकडून विकासकामांना महत्त्व देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे सेनेकडून 'शिवसेनेने जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण' अशा आशयाच्या टॅगलाईनसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले बॅनर झळकत आहेत, तर भाजपकडून 'नमो भारत, नमो ठाणे' आणि 'विकासाला गती देणारा पर्याय एकच- भाजप' अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर युतीमधील वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांना स्थान देण्यात आले असून, प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात रंगले ‘बॅनर’ युद्ध
ठाण्यात रंगले ‘बॅनर’ युद्ध

बस झाली घराणेशाही

दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. 'नगरसेवक मीच, नगरसेविका मीच, आमदार मीच, मंत्री मीच… बस झाली घराणेशाही! आता यातून बाहेर पडूया!' असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकले असून, त्यावर दोन्ही पक्षांची चिन्हे आहेत. या माध्यमातून घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना थेट लक्ष्य करण्यात आले आहे.

ठाण्यात रंगले ‘बॅनर’ युद्ध
ठाण्यात रंगले ‘बॅनर’ युद्ध

आता बदल हवा

शहरातील विविध भागांमध्ये रखडलेल्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरही विरोधकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत. 'स्वतःचे कॉम्प्लेक्स उभे राहतात, आमचा पुनर्विकास मात्र वर्षानुवर्षे रखडलेलाच… आता बदल हवा' अशा आशयाचे होर्डिंग तीन पेट्रोल पंप, मासुंदा तलाव, गोखले रोड आदी ठिकाणी दिसून येत आहेत. या बॅनरमधून सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या या बॅनरबाजीमुळे प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. थेट आरोप-प्रत्यारोप, विकास विरुद्ध असंतोष आणि नेतृत्व विरुद्ध मुद्दे असा सामना रंगताना दिसणार आहे.

राज्यातील हजारो करदात्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

"सर्वांना माफ कर..." ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हरिश राणाच्या इच्छामरणाचा प्रवास सुरु; भावनिक निरोपाचा VIDEO व्हायरल

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"

PNG वाले सरकारसाठी सावत्र! पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांना LPG जोडणी ठेवण्यास सरकारची मनाई