ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकालांपैकी एक म्हणून माजी महापौर अशोक वैती यांच्या पराभवाकडे पाहिले जात आहे. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत अशोक वैती यांनी, पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझीच आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
ठाणे महापालिकेच्या ७९ जागांपैकी शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ जागांवर विजय मिळवला असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागात माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या निकालाबाबत शहरात विविध तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशोक वैती यांनी स्वतः पुढे येत पराभवामागची कारणे सविस्तरपणे मांडली. या प्रभागातून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी खुस्पे विजयी झाले असून, हा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष लक्षवेधी ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागातील हा पराभव शिंदे गटासाठी धक्कादायक मानला जात असला, तरी अशोक वैती यांनी या निकालाकडे संयमित आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिले आहे.
आमच्या प्रभागातील इतर तीन उमेदवार नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच विजयी झाले आहेत. त्यामुळे हा निकाल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पराभव आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे वैती यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली; मात्र त्या विश्वासाला अपेक्षित न्याय देता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आनंद आश्रमातील जनता दरबार, आयुक्तालय तसेच मंत्रालय स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांची अनेक कामे मार्गी लागली, असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी आपले संबंध सदैव सौहार्दपूर्ण राहिल्याचेही स्पष्ट केले. शिंदे यांच्याशी आमचा कधीही वाद नव्हता आणि पुढेही राहणार नाही, असे ते म्हणाले.
पराभवाची कारणे अनेक असतात. काही विकासकामे वेळेत पूर्ण न होणे, तसेच काही विशिष्ट समाजघटकांचा कल बदलणे, हे घटक आम्ही मान्य करतो. मात्र पराभव किती मतांनी झाला, याला फारसा अर्थ नाही. पराभव म्हणजे पराभवच असून तो मी मनापासून स्वीकारला आहे, असेही वैती यांनी स्पष्ट केले. निवडणूक हरलो तरी जनतेची सेवा थांबवायची नाही, हेच आनंद दिघे यांनी आम्हाला शिकवले, असेही त्यांनी सांगितले.
हा पराभव वैयक्तिक नसून संघटनात्मक पातळीवर
निवडणुकीतील पराभवासाठी कोणावरही दोषारोप करणे मला योग्य वाटत नाही, असे सांगत वैती यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीचा उल्लेख केला. गेल्या ४२ ते ४५ वर्षांच्या राजकीय प्रवासात आनंद दिघे किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे मी कधीही कोणाविरुद्ध तक्रार केलेली नाही. हा पराभव वैयक्तिक नसून संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
मतमोजणीतील आकडे ठरले निर्णायक
पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर नगरमध्ये सुमारे साडेतीन हजार मतांची पिछाडी असल्याची कल्पना आधीच होती. मात्र दुसऱ्या फेरीत रामचंद्र नगर, वैतीवाडी, लेनिन नगर आणि आदर्श नगर या भागांत अवघ्या ३५० मतांची पिछाडी राहिली. त्या टप्प्यावरच पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्याचेही अशोक वैती यांनी स्पष्ट केले.