ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गावर बुधवारी (दि.४) पहाटे भीषण अपघात झाला. पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ भाजीपाल्याचा टेम्पो दुभाजकाला धडकला. त्यानंतर मागून येणारा रसायनांनी भरलेला टँकर टेम्पोला धडकून रस्त्यावर उलटला. या टँकरमध्ये तब्बल २० हजार लिटर रासायनिक पदार्थ होता. अपघातात टेम्पोचालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर दोन्ही दिशांना मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना या कोंडीचा मोठा फटका बसला.
टेम्पोला धडकल्यानंतर रासायनिक टँकर उलटला
बुधवारी पहाटे २.४४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कळवा येथून भाजीपाला घेऊन एक टेम्पो ओवळ्याच्या दिशेने जात होता. पातलीपाडा उड्डाणपुलाच्या चढणीवर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो दुभाजकाला धडकला. याचवेळी मागून येणाऱ्या रसायनांच्या टँकरची टेम्पोला धडक बसली. या धडकेनंतर टँकर रस्त्यावर उलटला, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखांनी दिली. हा टँकर नवी मुंबईतील जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने जात होता. त्यामध्ये २० हजार लिटर रासायनिक पदार्थ होता. अपघातानंतर टँकरमधील काही रसायन रस्त्यावर सांडलं. धडकेमुळे रस्त्यावरील विजेचा खांबही कोसळला.
क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवली
अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली आणि चितळसर-मानपाडा पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमी टेम्पोचालकाला रुग्णालयात हलवण्यात आलं. रस्त्यावर कोसळलेला खांब बाजूला करण्यात आला. तसेच सांडलेल्या पदार्थावर माती टाकण्यात आली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनं हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं.
घोडबंदर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
या अपघाताचा मोठा परिणाम सकाळच्या वाहतुकीवर झाला. घोडबंदर मार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळी ९.३० नंतरही घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पातलीपाडा ते कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठापर्यंत वाहतूक कोंडी होती.
तर घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक नोकरदारांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला. अपघातग्रस्त वाहनं हटवण्याचं काम सुरू असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.