ठाणे : घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला असून, भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. आता उद्धव ठाकरे गटानेदेखील या मुद्द्यावर उडी घेतली आहे. घोडबंदर रोड सेवा रस्ता विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा, अन्यथा ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उद्धव सेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे.
शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विलीनीकरणाच्या कामासाठी पुढाकार घेतला असतानाच, आता भाजप आणि उद्धव सेना दोन्ही पक्षांनी विरोध केल्यामुळे हे काम थांबते का, की पुढे सरकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विचारे यांनी आपल्या पत्रात घोडबंदर परिसरातील वाहतूककोंडी, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि सेवा रस्ता विलीनीकरणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी नमूद केले की, घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण झाल्याने वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रहिवासी नोकरीसाठी खासगी वाहने वापरतात; पण वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे सकाळी ७ ते १० या बंदीच्या वेळेतही अवजड वाहने मार्गावर सोडली जातात. परिणामी, काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात.
शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता
सेवा रस्ता मुख्य हायवेमध्ये विलीन केल्यास या परिसरातील ८ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या वस्त्या, सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मंदिरे, चर्च आणि बाजारपेठ यांना मोठा धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर वाहतूककोंडीच्या मुद्द्यावरून रहिवासी, भाजप, मनसे आणि आता उद्धव सेनेने उडी घेतल्याने शिंदे गटासमोर अडचणी वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.