ठाणे : ठाणे शहराभोवती प्रस्तावित असलेल्या इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाविरोधात नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रिंग मेट्रोच्या मुद्द्यावर नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी (३० ऑगस्ट) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून ठाणेकरांना करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात रविवारी सकाळी १० वाजता आशर इन्फिनिटी, प्रशांत कॉर्नरजवळ स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन रिंग मेट्रोविरोधातील आपला आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी काळ्या रंगाचा ड्रेस कोड पाळावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे.
दरम्यान, या आंदोलनात कोणतेही राजकीय बॅनर अथवा झेंडे आणू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहभागातून पक्षविरहित पद्धतीने रिंग मेट्रोविरोधातील आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ठाणे शहरातील विकास प्रकल्पांबाबत निर्णय घेताना सर्वसामान्य नागरिकांच्या मतांचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. 'आता सर्वसामान्य नागरिकांना गृहीत धरून चालणार नाही. आपले शहर, आपला आवाज आणि प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार,' असा संदेश देत नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वाक्षरी मोहिमेनंतर आंदोलनाची दिशा ठरणार
स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून रिंग मेट्रोविरोधातील नागरिकांचा विरोध एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत तसेच प्रकल्पासंदर्भातील माहिती पारदर्शकपणे नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.