Thane : नरेंद्र मेहतांनी आधी पाणीवाटपाचे गणित समजून घ्यावे! राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा टोला 
ठाणे

Thane : नरेंद्र मेहतांनी आधी पाणीवाटपाचे गणित समजून घ्यावे! राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा टोला

सूर्या प्रकल्पातून ठाणे शहराला अतिरिक्त ६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोध दर्शविल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Swapnil S

ठाणे : सूर्या प्रकल्पातून ठाणे शहराला अतिरिक्त ६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोध दर्शविल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. नरेंद्र मेहता यांनी या विषयावर विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती, आकडेवारी आणि पाणीवाटपाचे गणित समजून घ्यावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लगावला आहे. तसेच, ठाण्यातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी बघ्याची भूमिका न घेता या प्रकरणात मध्यस्थी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सूर्या प्रकल्पातून ठाण्याला अतिरिक्त ६० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली असताना नरेंद्र मेहता यांच्याकडून विरोध केला जात असल्याचा आरोप प्रधान यांनी केला.

प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, सूर्या प्रकल्पातील धामणी धरण आणि कवडास बंधाऱ्यातून एकूण ४०३ एमएलडी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मीरा-भाईंदरला २१८ एमएलडी, वसई-विरारला १७० एमएलडी, तर प्रकल्पाजवळील २७ ते ४४ गावांसाठी १५ एमएलडी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. मीरा-भाईंदरची लोकसंख्या सुमारे १५ लाख असून, सध्या शहराला १९५ ते २०० एमएलडी पाणी मिळते. शहराची गरज २४० ते २८० एमएलडी आहे. दुसरीकडे, ठाण्याची लोकसंख्या सुमारे २९.८ लाख असून, शहराला दररोज ५९० एमएलडी पाणी मिळते. मात्र, गरज ६२७ ते ६४० एमएलडी असल्याने पाण्याची तूट भासत आहे. सूर्या प्रकल्पातून मीरा-भाईंदरला नियोजित २१८ एमएलडी पाणी मिळाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून ठाण्याला ६० एमएलडी दिले, तरी मीरा-भाईंदरकडे ७८ एमएलडी अतिरिक्त पाणी शिल्लक राहू शकते, असा दावा प्रधान यांनी केला.

ठाण्यात पाय ठेवू देणार नाही

मीरा-भाईंदरच्या हक्काचे पाणी कमी करण्याचा प्रश्न नसून उपलब्ध अतिरिक्त पाण्याच्या वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करू नये, असेही प्रधान म्हणाले. भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माधवी नाईक यांनी या विषयात लक्ष घालून मध्यस्थी करावी. ठाणेकरांच्या हक्काच्या पाण्यात अडथळा निर्माण झाल्यास तीव्र विरोध केला जाईल. ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना ठाण्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार