ठाणे : गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मेट्रो मार्गिका क्रमांक ४ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होणार आहे. गायमुख–कासारवडवली–कॅडबरी जंक्शन या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मेट्रो मार्गिका क्रमांक ४ आणि ४अ या मार्गांची एकूण लांबी ३५.२० किलोमीटर असून, या प्रकल्पांतर्गत एकूण ३२ स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गिकेमुळे मुंबई, ठाणे तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
कान्होजी आंग्रे स्मारकातून पर्यटनाला चालना
ठाणे शहराच्या विकासासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नांगला बंदर चौपाटी परिसराचा सुंदर पर्यटन केंद्र म्हणून विकास होत असून, गायमुख चौपाटी आणि कान्होजी आंग्रे स्मारक उभारण्याच्या माध्यमातून या परिसराला नवी ओळख मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून या विकासकामांसाठी सुमारे २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पांमुळे ठाणेकरांना निसर्गरम्य पर्यटनस्थळ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक पर्यटन, रोजगार आणि व्यावसायिक संधींनाही चालना मिळेल.
दोन वर्षांत ठाण्याचे विकसित रूप दिसेल
“मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होईल. गायमुख चौपाटी आणि कान्होजी आंग्रे स्मारकासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. वाहतूक, पायाभूत सुविधांच्या कासाचा समन्वय साधून ठाणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात आहे.
वाहतूक कोंडीवर मेट्रोचा प्रभावी पर्याय
गायमुख ते कॅडबरी जंक्शन या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे घोडबंदर परिसरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल. प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि प्रवाशांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे ठाण्यातील आर्थिक व व्यावसायिक केंद्रांशी संपर्क अधिक सुलभ होणार असून, शहराच्या विकासालाही गती मिळणार आहे.