ठाणे : मेट्रो सेवा सुरू होण्याआधीच मेट्रो स्थानकांच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. काही स्थानकांची नावे बदली करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत तसेच मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत मेट्रो चार, मेट्रो ९ आणि मेट्रो १० ची कामे सुरू आहेत. याठिकाणी असलेल्या काही स्थानकांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नानासाहेब धर्माधिकारी, महापालिका भवन अशी काही नावे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मेट्रो कारशेडची नावेही बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात अनेक गावे व आदिवासी पाडे असून ठाणे व मीरा-भाईंदर शहराच्या जडणघडणीत व विकासात आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान आहे. याठिकाणी सध्या मेट्रोची कामे सुरू असून त्यांचे लवकरच लोकार्पण देखील होणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचविलेली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावे देखील देण्यात आलेली आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
मेट्रो-१० च्या स्थानकांची नावे:
१) भाईंदरपाडा गायमुख २) रेतीबंदरऐवजी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी ३) चेना व्हिलेजऐवजी चेना गाव ४) वर्साेवा ५) काशिमीरा ६) दहिसर मेट्रो क्रमांक ९ च्या डोंगरी येथे वेलंकनी देवीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे डोंगरी कारशेडला वेलंकनी माताचे नाव देण्यात यावे. तसेच मेट्रो क्रमांक ४ मोघरपाडा येथे पुरातन कापरादेव मंदिर असल्याने मोगरपाडा कारशेडला कापरादेव असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मेट्रो-४ च्या स्थानकांची नावे:
१) गायमुख भाईंदरपाडा २) मोघरपाडा ओवळा ३) वाघबीळ ४) कासारवडवली ५) मानपाडा ६) तत्त्वज्ञान विद्यापीठ ७) कापूरबावडी ८) माजीवडा ९) कॅडबरी जंक्शनऐवजी ठाणे महानगरपालिका भवन १०) छत्रपती संभाजी नगर स्थानक ११) आरटीओ १२) तीन हात नाकाऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक
मेट्रो-९ च्या स्थानकांची नावे :
१) दहिसर २) पांडुरंग वाडी ३) मीरा गाव ४) काशिगाव ५) साईबाबा नगर ६) मेडतिया नगरऐवजी प.पू. नानासाहेब धर्माधिकारी स्थानक ७) शहीद भगतसिंग नगर उद्यान ८) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक