ठाणे

ठाणे महापालिकेसमोर २९० कोटींचे शिवधनुष्य; कर न भरणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा

ठाणे महानगरपालिकाच्या मालमत्ता कर विभागाला यंदा ९२० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जानेवारी अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५६५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी अखेर ही रक्कम ६३० कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे आता अवघ्या एका महिन्यात २९० कोटी रुपयांची वसुली करण्याचे मोठे आव्हान विभागासमोर उभे ठाकले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या मालमत्ता कर विभागाला यंदा ९२० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जानेवारी अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५६५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी अखेर ही रक्कम ६३० कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे आता अवघ्या एका महिन्यात २९० कोटी रुपयांची वसुली करण्याचे मोठे आव्हान विभागासमोर उभे ठाकले आहे.

गेल्या एक-दोन महिन्यांपासून अपेक्षेप्रमाणे वसुली होत नसल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. कर न भरणाऱ्या निवासी मालमत्ताधारकांचे नळजोडणी खंडित करणे, अनिवासी मालमत्तांवर जप्ती व सील करण्याची कारवाई करणे, तसेच वॉरंट बजावणे अशा उपाययोजना राबविण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मागील वर्षी मालमत्ता कर विभागाला ८५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८१० कोटींची वसुली करण्यात यश आले होते. यंदा मात्र उद्दिष्ट ९२० कोटींवर नेण्यात आले आहे. आता उर्वरित एका महिन्यात २९० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाला मोठे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

अनिवासी मालमत्तांबाबत स्वतंत्र मोहीम

पाणीपुरवठा विभागाकडून नळजोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनिवासी मालमत्तांबाबत स्वतंत्र मोहीम राबवून जप्ती व सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित आदेश सर्व सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आले आहेत. कर वसुली वाढविण्यासाठी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. नागरिकांनी थकबाकी तातडीने भरावी, अन्यथा अप्रिय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सुट्टीच्या दिवशी करवसुली संकलन केंद्रे सुरू

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच फेब्रुवारी व ३१ मार्चपर्यंत सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (३ मार्च २०२६ रोजी धुळीवंदन वगळता) सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत, तर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत करवसुली संकलन केंद्रे व मुख्य कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

एकजुटीने लढणार! इंडिया आघाडीचा निर्धार; मोदी, शहा, ज्ञानेश हेच मतचोरीचे सूत्रधार - राहुल गांधी

CJP ची खाती तपास यंत्रणांच्या रडारवर; गुप्तचर अहवालात वर्तविली परकीय हस्तक्षेपाची शक्यता

बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनांवरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टात आव्हान

CJP Protest : सीजेपी नेत्यांना ताब्यात घेणे म्हणजे ‘अपहरण’ - अभिजीत दिपके