Thane : महापालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा खारेगावमध्ये; ८ जूनपासून शाळेला सुरुवात होणार - आयुक्त सौरभ राव  
ठाणे

Thane : महापालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा खारेगावमध्ये; ८ जूनपासून शाळेला सुरुवात होणार - आयुक्त सौरभ राव

ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ८ जूनपासून खारेगाव येथे सुरू होत आहे. ‘क्रिस्टल हाऊस इंडिया’च्या सहकार्याने सुरू होणारी ‘ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस’ ही शाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

Krantee V. Kale

ठाणे : ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ८ जूनपासून खारेगाव येथे सुरू होत आहे. ‘क्रिस्टल हाऊस इंडिया’च्या सहकार्याने सुरू होणारी ‘ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस’ ही शाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या शाळेच्या कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला.

खारेगाव येथील सफायर रुग्णालयाजवळ उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ठाणे महापालिकेकडून सुरू आहे. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि लिफ्ट बसविण्याची कामे करण्यात येत आहेत.

सध्या शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी, खिडक्यांना ग्रील बसविणे, खेळाचे मैदान तयार करणे, अग्निशमन यंत्रणेची दुरुस्ती आणि लिफ्ट दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू करण्याची तयारी पूर्णत्वाकडे पोहोचल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह विविध सुविधा

क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाकडून प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, भोजन व्यवस्था आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत. प्रारंभी नर्सरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून पुढील टप्प्यात इतर वर्गांचा विस्तार केला जाईल.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी

या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. दरम्यान, ठाणे महापालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्यात ३० सप्टेंबर २०२५ रोजी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून हा करार ३० वर्षांसाठी लागू राहणार आहे. महापालिकेने प्रशासकीय मान्यता देत सीबीएसई बोर्डाची पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; २० जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, बचावकार्य सुरू

Mumbai Rain : पावसाच्या हलक्या सरींमध्येच अंधेरी सबवे पाण्याखाली; BMC च्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

तीन ब्रेन-डेड रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अवयवदान; अनेकांना मिळाले जीवनदान; मुंबईत सामाजिक जाणिवेचे दर्शन

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा; SIT चौकशीची सुप्रिया सुळे यांची मागणी

दहशतवाद्यांच्या रडारवर भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे?