विरोधी पक्षनेतेपदाची उत्सुकता कायम; स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन व विषय समित्यांचा मार्ग मोकळा 
ठाणे

Thane : विरोधी पक्षनेतेपदाची उत्सुकता कायम; स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन व विषय समित्यांचा मार्ग मोकळा

ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झाली असली तरी अद्याप एक महिना पूर्ण न झाल्याने अंतिम गटनोंदणीची अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झाली असली तरी अद्याप एक महिना पूर्ण न झाल्याने अंतिम गटनोंदणीची अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमआयएम एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याबाबत संभ्रम कायम आहे. अंतिम गटनोंदणी स्पष्ट झाल्यानंतरच पुढील राजकीय दिशा ठरणार असली, तरी २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, विरोधी पक्षनेता आणि पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेतील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती १६ सदस्यांची असते. संभाव्य राजकीय गणितानुसार त्यात शिंदेसेना ९, भाजप ३, राष्ट्रवादी (शरद पवार) १, राष्ट्रवादी (अजित पवार) १ आणि एमआयएम १ असे १५ सदस्यांचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मात्र उर्वरित एक सदस्य कोणत्या पक्षाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पहिल्या सत्रात शिंदे सेना कोणाला संधी देते, याकडेही लक्ष लागले आहे.

समित्यांमध्ये शिंदेसेनेचा वाटा मोठा

ठाणे महापालिकेतील सध्याचे संख्याबळ असे शिंदेसेना ७५, भाजप २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, उद्धव सेना १ आणि अपक्ष १, असे एकूण १३१ नगरसेवक. शिंदेसेनेने स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्याने स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन आणि विषय समित्यांमध्ये त्यांचा मोठा वाटा असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अंतिम गटनोंदणीची प्रतीक्षा

सर्व पक्षांनी आपापली गटनोंदणी कोकण आयुक्तांकडे सादर केली आहे. मात्र १६ फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच खरी राजकीय स्थिती स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता, तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमआयएम युतीची चर्चा यामुळे अंतिम गट रचना बदलू शकते. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि राजकीय पक्ष दोघेही अंतिम यादीकडे लक्ष ठेवून आहेत.

इतर समित्यांची रचना

विषय समित्यांमध्ये प्रत्येकी ९ सदस्यांची नेमणूक केली जाते. यामध्ये परिवहन समितीत १२ निवड सदस्य + १ पदसिद्ध सदस्य (एकूण १३), तर शिक्षण मंडळात ९ सदस्यांचा समावेश असतो. महासभेनंतर महापालिकेतील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट होणार असून, आगामी वर्षभराच्या कारभाराची दिशा या समित्यांच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा सस्पेन्स

महासभेत विरोधी पक्षनेतेपदावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र हे पद नेमके कोणाकडे जाणार यावर अजूनही पडदा आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून सूचित करण्यात आले आहे.विरोधी पक्षनेतेपदासाठी काही नावे पुढे आली असून, त्यात नजीब मुल्ला (राष्ट्रवादी अजित पवार गट, जिल्हाध्यक्ष), शानू पठाण, प्रकाश बर्डे, सुधीर भगत (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र शिंदे सेनेला महापालिकेत अधिकृत विरोधी पक्षनेता नको असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याने, हे पद प्रत्यक्षात दिले जाईल का, याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे.

मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले, मिळत नाही आठ तासांचीही झोप; शहरी जीवनशैलीचा दुष्परिणाम

CBSE चा मोठा निर्णय; मध्यपूर्वेत ७ देशांतील बारावीच्या परीक्षा रद्द, निकालाबाबत लवकरच होणार घोषणा

Air Indiaच्या ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर; ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड

दहावी-बारावी परीक्षेत 'मास कॉपी'चे प्राबल्य; १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे; निलंबनाची कारवाई

ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन