ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला यंदा नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल २६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, कर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन आणि कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याने महापालिकेच्या डिजिटल सेवा उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. महापालिकेने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना एसएमएस आणि डिजिटल लिंकच्या माध्यमातून देयके पाठविली होती. या सुविधेमुळे ११ जून २०२६ पर्यंत शहरातील १ लाख ७७ हजार ३२२ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, हे प्रमाण एकूण करदात्यांच्या सुमारे ३२ टक्के आहे. महापालिकेच्या ‘अर्ली बर्ड’ योजनेंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरला.
ठाणे महापालिकेमार्फत गत आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये ८७८ कोटी ३७ लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला होता. गतवर्षासाठी ९१५ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते, ज्याच्या ९६ टक्के एवढा मालमत्ता कर प्राप्त करण्यात महापालिकेला यश आले होते. यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीलाच मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे पालिकेचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुविधा
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक म्हणजेच १२९.५२ कोटी रुपयांचा कर भरणा ९९ हजार ६२८ करदात्यांनी ऑनलाइन माध्यमातून केला आहे. याशिवाय १८ हजार २९७ करदात्यांनी धनादेश व डिमांड ड्राफ्टद्वारे ११३.२३ कोटी रुपये भरले, तर ५९ हजार ३९७ करदात्यांनी रोख स्वरूपात २२.६२ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. मालमत्ता कर संकलन सुलभ करण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील १० कर संकलन केंद्रे रविवार वगळता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू ठेवली आहेत.