ठाणे

ठाण्याच्या राजकारणात हालचालींना वेग; महायुतीत अनिश्चितता, भाजपचा ५२ जागांसाठी आग्रह; मविआची औपचारिक घोषणा बाकी

अतुल जाधव / ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत. भाजप-शिंदे सेना यांच्यातील युती व जागावाटपाबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच...

Krantee V. Kale

अतुल जाधव / ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत. भाजप-शिंदे सेना यांच्यातील युती व जागावाटपाबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच, शिंदे सेनेकडून १३१ प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचे गणित जवळपास जुळल्याचे चित्र असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घडामोडींमुळे ठाण्यातील निवडणूक राजकारणाला वेगळीच धार मिळाली आहे.

शिंदे सेनेकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू; १३१ जागांसाठी स्वबळाच्या चाचपणीला गती

ठाण्यात महायुतीबाबत अद्याप अनिश्चिततेचे वातावरण असतानाच, शिंदे सेनेने मंगळवारपासून १३१ प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरू असून, युतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. या प्रक्रियेमागे कार्यकर्त्यांमधील संभाव्य बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, मंगळवारपासून शिंदे सेनेकडूनही १३१ प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. आनंद आश्रम येथे झालेल्या या मुलाखती खासदार नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, ए. एस. पाटील, हणमंत जगदाळे, हेमंत पवार, माजी महापौर रमेश वैती आदी नेत्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. दरम्यान, युती व जागावाटपाचा चेंडू दोन्ही पक्षांनी वरिष्ठांच्या कोर्टात टाकला असून, अंतिम निर्णय तेच घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपचा ५२ जागांसाठी अट्टाहास

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी स्वबळाचा नारा दिल्याने, ठाण्यात भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांमध्ये पहिल्या दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, भाजपने ठाण्यातील ५२ जागांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच प्रस्ताव दुसऱ्या बैठकीत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडे २४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ असताना त्यांनी ५२ जागांवर दावा केला असून, त्यात शिंदे सेनेच्या काही जागांचाही समावेश असल्याची मागणी आहे. त्यामुळे दुसऱ्या बैठकीनंतरही जागावाटपाबाबत चर्चा पुढे सरकू शकलेली नसल्याचे चित्र आहे.

युतीच्या अधिकृत घोषणेनंतरच जागावाटप; खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन

शहरात भाजप आणि शिंदे सेनेमधील युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी युतीविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असून, युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. युती व जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात. सध्या संपूर्ण प्रक्रिया सुरू असून, कुठेही जागावाटपाचा तिढा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवार निवडताना संघटनात्मक काम, निवडून येण्याची क्षमता आणि सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची ताकद हे महत्त्वाचे निकष असतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या, मात्र निवडणुकांच्या काळात अशा युती व आघाड्या होतच असतात, असे नमूद केले.

मुंबईबाबत बोलताना खासदार म्हस्के म्हणाले की, मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असा उद्धव सेनेचा दृष्टिकोन आहे. मुंबईबाहेर त्यांच्या नेत्यांनी कधीच लक्ष दिले नाही. फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करून सत्ता कशी मिळवायची, हाच त्यांचा एकमेव विचार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

याआधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने काँग्रेसला जवळ केले, आता मनसेला जवळ करत आहेत. ही धरसोड वृत्ती जनतेच्या लक्षात आली असल्याचे त्यांनी म्हटले. कदाचित काँग्रेसलाही हे लक्षात आले असावे की काहीजण केवळ त्यांचा फायदा घेत आहेत, किंवा यूबीटीकडे जनाधार नाही, हे त्यांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढण्याची भूमिका घेत असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे स्टेजवर असतील आणि राज ठाकरे बाजूला उभे राहतील, एवढेच चित्र दिसेल. त्यातून वेगळे काय सिद्ध होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित जुळले

ठाण्यात महायुतीच्या जागावाटपाबाबत अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच, महाविकास आघाडीत मात्र जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडील जागावाटपाची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात पोहचली असून, आता केवळ औपचारिक शिक्कामोर्तब बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वाट्याला सुमारे ५० जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना ४० ते ४५ जागा, मनसेला २५ ते ३० जागा, तर काँग्रेसला सुमारे १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसने मुंब्रा परिसरात काही जागांची मागणी केल्याचेही समजते.

ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सखोल चर्चा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर काँग्रेसने ३५ जागांचा प्रस्ताव मांडला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी ५० जागांवर दावा केला होता. राष्ट्रवादी शरद पवार गट ठाण्यात अधिक जागांवर दावा करीत असल्याने, तसे झाल्यास हा गट ठाण्यात ‘मोठा भाऊ’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती.

एकूणच, महाविकास आघाडीतील जागावाटपाचे प्राथमिक समीकरण पुढे आले असून, उद्धव सेनेला सुमारे ५०, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ४० ते ४५, मनसेला २५ ते ३० आणि काँग्रेसला सुमारे १५ जागा मिळण्यावर एकमत होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उद्धव सेनेची बिकट अवस्था

उद्धव सेनेच्या वाट्याला ३० जागा आणि मनसेला ३० जागा मिळाव्यात, अशी सुरुवातीची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ठाण्यात उद्धव सेनेकडे सध्या अवघे तीन माजी नगरसेवक उरले असून, अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल झाल्याने त्यांच्या ताकदीवर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने अधिक जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशिष्ट जागांवर लक्ष

मनसेला ठाण्यात अद्याप निवडणुकीत यश मिळालेले नसले, तरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या आधारे उद्धव सेना व मनसेने काही विशिष्ट प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. वागळे इस्टेट, किसननगर, घोडबंदर रोड, जुने ठाणे, वर्तकनगर आदी प्रभाग हे या दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट)ने कळवा आणि मुंब्रा परिसरात मोकळीक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, काँग्रेसनेही मुंब्रा परिसरातील काही जागांवर दावा केल्याने, तेथे राष्ट्रवादी गट काँग्रेससाठी काही जागा सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे.

"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण

"घेरलं होतं मातोश्रीवरील 'विठ्ठलाला' बडव्यांनी.." उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या घोषणेनंतर आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका; "ही युती फक्त स्वार्थासाठी आणि...

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?