ठाणे : ठाणे महापालिकेच्या नोकर भरती प्रक्रियेला वेग आला असला तरी भरती प्रक्रियेबाबत स्थानिक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ठाणे महापालिकेने नोकर भरतीबाबत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत स्थानिक नागरिकांबाबत कोणताच उल्लेख नसल्याने स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेची जम्बो मॅगा भरती प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार १७७३ पदांची भरती केली जाणार आहे. परंतु काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने ठाणे महापालिकेत सुरक्षारक्षक, व्हाॅल्वमन, इलेक्ट्रिक चेकर आदींसह इतर काही महत्त्वाच्या पदांची भरती करण्यात आली होती. त्यावेळेस काही अधिकाऱ्यांना आपल्या गावाकडील उमेदवारांना प्राधान्य दिल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे आताच्या भरती प्रक्रियेतही तशीच भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास स्थानिकांची पुन्हा निराशा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेत सुरक्षारक्षक आणि पाणी खात्यातील व्हाॅल्वमनची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या भरती प्रक्रियेच्या वेळेस सुमारे ३५० च्या आसपास सुरक्षारक्षक, व्हाॅल्वमन आणि इलेक्ट्रिक चेकर आदींची परीक्षा घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत महापालिकेत मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र ठरल्याचा मुद्दा महापालिकेत चांगलाच गाजला होता. त्यामुळे स्थानिकांना यात संधीच मिळाली नव्हती.
दरम्यान, आता ठाणे महापालिकेने नव्याने १७७३ पदांची भरती प्रक्रिया राबविली आहे. ही भरती प्रक्रिया राबवित असताना २०१७ मध्ये झालेल्या ठरावाची कदाचित पालिकेला विसर पडला असावा असे चित्र दिसत आहे.
‘त्या’ ठरावाचे पालिकेला विस्मरण
२०१७ मध्ये सर्वपक्षीय महासभेत ठराव झाला होता. त्यात भरती प्रक्रियेत ५० टक्के स्थानिक उमेदवारांना संधी दिली जाईल, असे ठरावात नमूद करण्यात आले होते. परंतु आता महापालिकेने जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यात हा उल्लेख कुठेही दिसून आलेला नाही. शिवाय मागील वेळेस भरती प्रक्रियेत ज्या पद्धतीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जिल्ह्यातील उमेदवार पात्र ठरले होते तसाच काहीसा प्रकार आता होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.