नामदेव शेलार/मुरबाड
महाविकास आघाडी म्हणजे उद्धवसेना, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांच्या एकत्रित शक्तीमुळे ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सत्ता येणार, असा विश्वास खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी व्यक्त केला.
मुरबाडमध्ये आयोजित संपर्क दरबारात लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करण्यासाठी खासदार बाळ्यामामा म्हात्रे दुसऱ्यांदा आले होते, यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले, आजचे राजकारण सांगता येत नाही, कोण कुठे जाईल हे ठरवणे कठीण आहे. ज्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात राहून निवडणूक लढवली, तेच सुभाष गोटीराम पवार आता ३-४ जागांसाठी भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे त्यांनी मुरबाडमधील आपली ताकद गमावली आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व त्यांच्या हातात होतं; त्यांनी ठरवलेल्या जागा त्यांना मिळाल्या असत्या, तरी ठेकेदारीसाठी पक्षांतर करून त्यांनी १ लाख ३० हजार मतदारांचा भ्रमनिरास केला, अशी टीका म्हात्रे यांनी केली. विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांशी संपर्क ठेवावा लागतो, म्हणूनच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला शरद पवार यांनी खूप काही दिले आहे. माझी खासदारकीची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठाम उद्गार खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी काढले.
जिल्हा परिषदेत २० पेक्षा जास्त जागा मिळतील
आम्हाला शहापूर आणि भिवंडी तालुक्यांत अधिक जागा मिळतील. मुरबाड तालुक्यातील ८ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीच्या जागांवर आम्ही लढणार आहोत. त्यांनी पुढे सांगितले की, सुभाष पवार यापूर्वी शिंदेसेनेत होते. त्यांनी माझ्या विरोधात काम केले. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत आले आणि त्यांच्यासाठी आम्ही कामही केले. पण पवार यांची राजकारणात सत्ता नसली की बेचैनी वाढते. मात्र, महाविकास आघाडी ठाणे जिल्हा परिषदेत वीसपेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येईल, याची मला खात्री आहे.