ठाणे

ठाणे : जिल्ह्यात आठ दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक; सहा सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

जिल्ह्यात सहा सरकारी रतपेढ्यांमधील आठ दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे.

Swapnil S

ठाणे : जिल्ह्यात सहा सरकारी रतपेढ्यांमधील आठ दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई पालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका या सहा ठिकाणी सरकारी रक्तपेढ्या आहेत. रुग्णांच्या शस्त्रक्रिया, अपघात, महिलांना प्रसूतीवेळी रक्ताचा पुरवठा रुग्णालयांना करावा लागतो. मात्र सहा सरकारी रक्तपेढ्यांमधील साठा कमी झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

जिल्ह्यातील महापालिका तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर कायम ताण असल्याचे जाणवते. सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची कायमच गर्दी असते.

मुबलक रक्तसाठा करून ठेवणे आरोग्य यंत्रणांचे महत्त्वाचे काम असते. महागड्या शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच मोठे अपघात यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे गरजू रुग्णांना आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. अनेक रुग्णांची धाव ही सरकारी रुग्णालयांकडे असते. यासाठी सरकारी रक्तपेढ्यांमध्ये मुबलक प्रमाणात रक्तसाठा करून ठेवण्यात येत असतो.

येथे संपर्क साधावा

इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. तसेच रक्तदान शिबीर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी (९८६९६८५२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

परीक्षेचा कालावधी असल्याने शिबिरांचे प्रमाण कमी

जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था देखील अनेकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असतात. मात्र सध्या परीक्षांचा कालावधी असल्याने शिबिरांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे, तर यावेळी उन्हाचा तडाखा अधिक असल्याने अनेक सामाजिक संस्था देखील शिबिरांचे आयोजन करत नसल्याने हवा तस रक्तसाठा झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी