ठाण्यात पार्किंगचे पैसे वसूल करणार; नियम मोडणाऱ्यास पाच पट दंड ठोठावण्याचा पालिकेचा प्रस्ताव 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाण्यात पार्किंगचे पैसे वसूल करणार; नियम मोडणाऱ्यास पाच पट दंड ठोठावण्याचा पालिकेचा प्रस्ताव

वाहतूककोंडीच्या नावाखाली वर्षानुवर्षे रखडलेले पार्किंग धोरण आता ठाणेकरांच्या खिशाला हात घालण्याच्या तयारीत आहे. पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवर सहा महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Swapnil S

ठाणे : वाहतूककोंडीच्या नावाखाली वर्षानुवर्षे रखडलेले पार्किंग धोरण आता ठाणेकरांच्या खिशाला हात घालण्याच्या तयारीत आहे. पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवर सहा महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रयोगात वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारले जाणार असून नियम मोडणाऱ्यांना पहिल्या दोन तासांच्या पार्किंग शुल्काच्या पाचपट दंड ठोठावला जाणार आहे. हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला.

शहरातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी वाढत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पार्किंग धोरण लागू करण्यापूर्वी निवडक रस्त्यांवर त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ठाण्याची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. तसेच शहरात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोंडी वाढली आहे.

ठाणेकरांच्या खिशावर किती भार?

  • दुचाकी : पहिले २ तास - १० रुपये

  • तीनचाकी : पहिले २ तास - १० रुपये

  • कार : पहिले २ तास - १५ रुपये

  • बस/ट्रक : पहिले २ तास - ८० रुपये

घोडबंदर पट्ट्यात ‘पेड पार्किंग’चा प्रयोग

प्रायोगिक तत्त्वावर पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एनक्लेव्ह टीसीएस, निसर्ग तपोवन ते ऋतु इस्टेट, वाघबीळ जंक्शन ते भूमीएकर ब्रह्मांड फेज-८, ब्रह्मांड-पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे.

या रस्त्यांवर सुमारे १,८०० पार्किंग लॉट उभारण्याचे नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी ४६५, तीनचाकींसाठी १००, कारसाठी १,११५ आणि बस-ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी ८३ लॉट प्रस्तावित आहेत.

पार्किंग ऑपरेटरची ‘एंट्री’

सहा महिन्यांच्या प्रयोगासाठी खासगी पार्किंग ऑपरेटर नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. पार्किंग लॉट तयार करणे, सूचना फलक लावणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, मोबाईल ॲप तयार करणे आणि नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ऑपरेटरवर टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पार्किंगमधून जमा होणारे १०० टक्के शुल्क महापालिकेच्या स्वतंत्र खात्यात जमा होणार आहे. त्यातून ऑपरेटरला पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी आणि चालविण्यासाठी काही हिस्सा देण्यात येणार असून, हा हिस्सा निविदेतून निश्चित केला जाणार आहे.

नियम मोडला तर खिशाला मोठी झळ

पार्किंग शुल्क न भरणे, परवाना नसणे किंवा मुदत संपलेला परवाना वापरणे, निश्चित जागेबाहेर वाहन उभे करणे, चुकीच्या झोनमध्ये पार्किंग करणे, डबल पार्किंग करणे तसेच दिव्यांग किंवा आपत्कालीन वाहनांसाठी राखीव जागेत वाहन उभे करणे यासाठी पाचपट दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत

ठाणेकरांवर करवाढीचे ओझे; प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत सादर