ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्यानंतर काल दिवसभर यावर सर्व स्तरांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या सर्व प्रकारानंतर शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्त कार्यालयाला घेराव घालून रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचे शिंदे गटाकडून चांगलेच पडसाद उमटले. यानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेत रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला. म्हस्के म्हणाले की, सिव्हिल हॉस्पिटल आणि संपदा हॉस्पिटलने जारी केलेल्या वैद्यकीय अहवालात तिला मारहाण झाली नव्हती आणि ती गर्भवती नव्हती. तसेच पोलिसांवर खोटे आरोप करून अपशब्द वापरले. उद्या आमच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला तर त्याला ठाकरे गट जबाबदार असेल, असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.
ठाकरे गटाच्या महिला अधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी रोशनी शिंदे यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध केला होता. ठाण्यातील महिला गुंडांनी रोशनी शिंदेना मारहाण केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता. राज्यात मुख्यमंत्री आहे की गुंड मंत्री असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी देखील ठाकरे यांनी केली.