Thane : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला वेग; दोन दुचाकी जप्त, संशयितांची चौकशी सुरू, CBI चौकशी मागणी 
ठाणे

Thane : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला वेग; दोन दुचाकी जप्त, संशयितांची चौकशी सुरू, CBI चौकशी मागणी

मानपाडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला असून, हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या दोन दुचाकी वर्तकनगर येथील समतानगर परिसरातून जप्त करण्यात आल्या आहेत.

Swapnil S

ठाणे : मानपाडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला असून, हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या दोन दुचाकी वर्तकनगर येथील समतानगर परिसरातून जप्त करण्यात आल्या आहेत.

तपासादरम्यान नितेश पवार या संशयिताची ओळख पटली असून, हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या आणखी एका हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.मंगळवारी रात्री मानपाडा परिसरातील गणेशनगर येथील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मानपाड्यासह ठाणे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ पथके तयार केली असून, त्यापैकी तीन पथके गुन्हे शाखेची आहेत. मुंबईसह मुंबईबाहेरील संभाव्य ठिकाणी संशयितांचा शोध सुरू आहे. खंडणीविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या दोन दुचाकींपैकी एका दुचाकीची नोंद नितेश पवारच्या भाच्याच्या नावावर आहे. हत्येचा कट नेमका कोणी रचला, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

‘मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही’

गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मानपाडा येथील पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पत्नी वैजयंती, मुलगी निकिता, मुलगा राम आणि बंधू जयनाथ यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली. खासदार अरविंद सावंत, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, आमदार अनिल परब आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यावेळी उपस्थित होते. हत्येतील एकही गुन्हेगार सुटता कामा नये. ज्याने कट रचला असेल, त्याचाही शोध घेतला जाईल. मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पूर्णेकर यांच्या मुलाने एका संशयित आरोपीचे राजेंद्र शिंदे यांच्यासोबतचे छायाचित्र, तसेच हत्येपूर्वीची पार्श्वभूमी आणि संशयित व्यक्तींबाबतची माहितीही कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर मांडली. हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांच्या भेटीनंतर निवासस्थानाबाहेर शिवसैनिक आणि नागरिकांनी ‘प्रदीप पूर्णेकर यांना न्याय द्या’, अशा घोषणा दिल्या.

पप्या शिंदेशी संपर्काची चौकशी

पोलिसांनी संशयित पप्या शिंदेच्या जवळच्या तीन महिलांसह अन्य काही व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावले आहे. हत्येपूर्वी या व्यक्तींचा पप्या शिंदेशी संपर्क झाल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपर्क कोणत्या कारणासाठी झाला आणि त्याचा हत्येच्या कटाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. पप्या शिंदेविरुद्ध यापूर्वी आठ ते नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाणे गुन्हेगारांचे शहर नाही - संजय केळकर

भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनीही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक दक्षतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. राजकीय स्पर्धा, वैमनस्य किंवा हेवेदाव्यांतून अशा घटना घडत असतील, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सत्य बाहेर आणले पाहिजे,”असे केळकर यांनी म्हटले. तडीपार केलेले काही गुन्हेगार पुन्हा शहरात फिरत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. संशयितांची चौकशी करावी; मात्र कोणतीही बाब दडपली जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ठाणे शहरातील एसआरए, क्लस्टर आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामांमध्ये मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. राजकीय वैमनस्य, स्थानिक वाद किंवा पुनर्विकासाशी संबंधित आर्थिक हितसंबंध यापैकी कोणत्याही बाबीचा हत्येशी संबंध आहे का, यासह सर्व शक्यता तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका