ठाणे : एल निनोच्या सावटातही ठाणे शहरात यंदा पावसाने गेल्या वर्षाची जवळपास बरोबरी साधली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत २,५५९.७३ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या २,५६४.२२ मिमीच्या तुलनेत अवघी ४.४९ मिमी तूट आहे. मात्र, पावसाची बेरीज समान असली तरी बदलते स्वरूप आणि वाढते काँक्रीटीकरण पर्यावरणासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
यंदा ३ सप्टेंबर रोजी ठाण्यात ८.८८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता व्यक्त होत असताना ठाण्यातील प्रत्यक्ष आकडेवारी मात्र वेगळे चित्र दाखवत आहे. हवामानाच्या दृष्टीने मात्र केवळ एकूण पर्जन्यमान पाहणे पुरेसे नसून पाऊस कोणत्या कालावधीत, किती तीव्रतेने आणि किती अंतराने पडतो, हे अधिक महत्त्वाचे ठरते.
ठाण्यातील पावसाची संपूर्ण स्थिती केवळ एल निनोच्या प्रभावाशी जोडणे योग्य ठरणार नाही. यंदाची आकडेवारी पाहता ठाण्यात पावसाची एकूण मात्रा गेल्या वर्षाच्या जवळपासच आहे; मात्र पावसाच्या वितरणातील बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ठाण्यासारख्या वेगाने काँक्रीटीकरण होणाऱ्या शहरासाठी हा मुद्दा अधिक गंभीर आहे. मोकळ्या जमिनी कमी होणे, नैसर्गिक नाले व जलवाहिन्यांवरील वाढता दबाव, पाणथळ जागांचे आकुंचन आणि वाढत्या बांधकामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगाने वाहून जात आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.