ठाणे : मुंबईतील खासगी शाळांमधून ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आलेल्या शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे शिक्षक आर्थिक संकटात सापडले असून, दिवाळीपूर्वी वेतन अदा न केल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिला आहे.
या संदर्भात बोरनारे यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांना निवेदन पाठवून समायोजित शिक्षकांचे वेतन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
वेतन रखडल्यामुळे अनेक शिक्षकांच्या गृहकर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते आणि इतर आर्थिक देणी थकली आहेत. विलंबामुळे संबंधित वित्तीय संस्थांकडून दंड आणि विलंब शुल्क आकारले जात असल्याने शिक्षकांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचे बोरनारे यांनी नमूद केले.
नियमितपणे अध्यापनाचे कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही गंभीर बाब आहे. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन समायोजित शिक्षकांचे वेतन सुरू करावे आणि दिवाळीपूर्वी त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने वेतनाचा प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.अनिल बोरनारे, अध्यक्ष कोकण विभाग
आर्थिक अडचणीने त्रस्त
मुंबईतील उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागांतर्गत खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे ऑगस्ट महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. त्यानुसार हे शिक्षक सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये नियमितपणे अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र, दोन महिने उलटूनही त्यांच्या वेतनाबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.