Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन X| Eknath Shinde
ठाणे

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाहतूक सुधारणा प्रकल्पासह विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाहतूक सुधारणा प्रकल्पासह विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे सिग्नलवर थांबण्याचा कालावधी सध्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेऐवजी अवघ्या १५ सेकंदांपर्यंत कमी होईल. यावेळी विकासकामे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत न ठेवता ती वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी 'ॲक्सेलरेटरवर पाय' ठेवण्याची गरज आहे. विकासकामे वेळेत पूर्ण होणे हीच नागरिकांची अपेक्षा असून, त्यासाठी कोणताही अनावश्यक विलंब टाळला पाहिजे. खेडा नगर येथून आनंदनगर, साकेत, गायमुख आणि फाऊंटन हॉटेलपर्यंत उड्डाणपूल उभारून ईस्टर्न फ्रीवेशी थेट जोडणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या रिंग रोड आणि बायपास मार्गामुळे अहमदाबाद, जेएनपीटी आणि मुंबईकडून येणारी अवजड तसेच आंतरशहरी वाहतूक शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर न येता पर्यायी मार्गाने वळवता येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यासह वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे-बोरिवली जुळ्या बोगदा प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे-बोरिवली प्रवासाचा कालावधी सध्याच्या दीड ते दोन तासांवरून अवघ्या २० मिनिटांवर येईल. ठाण्यातील पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या पायाभूत कामांनाही सुरुवात झाली असून, निवासी संकुले, प्रमुख वाहतूक केंद्रे, रुग्णालये आणि व्यापारी संकुलांना या सेवेची जोडणी दिली जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, गंभीर रुग्णांच्या तातडीच्या वाहतुकीसाठी हेलिपॅडसह एअर ॲम्ब्युलन्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी नियोजन

युरोपीय शहरी पायाभूत सुविधा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पात भूमिगत जलवाहिन्या, गॅस पाईपलाइन, इंधन वाहिन्या आदी सुविधांचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तीन हात नाका हा सात दिशांमधून येणाऱ्या वाहनांचा संगमबिंदू असून, शहरातील सर्वाधिक वाहतूककोंडीच्या ठिकाणांपैकी एक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे सिग्नलवर थांबण्याचा कालावधी सध्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेऐवजी अवघ्या १५ सेकंदांपर्यंत कमी होईल. त्यामुळे मुंबई, नाशिक, नौपाडा, वागळे इस्टेट, कोपरी तसेच प्रस्तावित नवीन ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा