रक्षाबंधनातून वाहतूक नियमांचे धडे; दंडाऐवजी राखी; मोफत हेल्मेटचे वाटप; ठाणे वाहतूक पोलिसांचा उपक्रम प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

रक्षाबंधनातून वाहतूक नियमांचे धडे; दंडाऐवजी राखी; मोफत हेल्मेटचे वाटप; ठाणे वाहतूक पोलिसांचा उपक्रम

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला. तीनहात नाका जंक्शन येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधून सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला.

Swapnil S

ठाणे : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला. तीनहात नाका जंक्शन येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधून सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विशेष म्हणजे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या काही वाहनचालकांना राखी बांधून त्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार, ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तीनहात नाका जंक्शन येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले.

यावेळी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांच्या हातावर राखी बांधली. ‘आपली सुरक्षितता हीच कुटुंबासाठी खरी भेट’ असा भावनिक संदेश देत वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा संदेश देण्याचा हा उपक्रम वाहनचालकांसाठीही वेगळा अनुभव ठरला.

या उपक्रमाला वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त अंजली भोईर, ठाणे नगर वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, नौपाडा वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्यासह वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हेल्मेट वापराचे महत्त्वही वाहनचालकांच्या मनावर ठसविण्यात आले.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि संरक्षणाचा सण मानला जातो. याच भावनेचा आधार घेत पोलिसांनी वाहतूक सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. दंडाची भीती दाखविण्यापेक्षा आपुलकीने नियम समजावून सांगितल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद

विशेषतः विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या काही वाहनचालकांना थांबवून हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे केवळ कायद्याचे पालन नसून, अपघाताच्या वेळी जीविताचे संरक्षण करण्यासाठी ते अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाला वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...