ठाणे : तलावांचे शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून पालिका प्रशासनाने सर्वांना पाणी काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरातील सर्व्हिस सेंटरला पाणी न वापरण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या आहेत. शहरातील १६६ सर्व्हिस सेंटर ला नोटिसा बजावताना कारवाईचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे. परंतु यापुढेही जाऊन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करण्यास १६ एप्रिल ते १० जूनपर्यंत मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने शहरातील १६६ सर्व्हीस सेंटरला नोटीस बजावल्या असून त्याठिकाणी तुर्तास पाण्याचा वापर बंद करण्यात आला असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार, दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर महापालिकेने निर्बंध घातले आहेत. या निबंर्धांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बोअरवेलच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे.
ठाण्यातील वाहनसंख्येने १८ लाखांचा पल्ला गाठला आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. यापैकी काहीजण सोसायटीच्या आवारातच आपली वाहने धुतात तर अनेकजण सर्व्हिस सेंटरचा रस्ता धरतात.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला १६६ सर्व्हीस सेंटर असून त्यांच्या ठिकाणी वाहनांची धुलाई केली जात असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या पाण्याचा, काही ठिकाणी विहिरींच्या पाण्याचा तर काही ठिकाणी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. परंतु आता महापालिकेने प्रभाग समितीनिहाय जाऊन त्या त्या भागातील प्रत्येक सर्व्हीस सेंटरला नोटीस बजावली असून पुढील १० जून पर्यंत वाहने धुतली जाऊ नयेत, अशा सूचना केल्या आहेत.
वाहन धुण्यासाठी लागते १० ते २० लिटर पाणी
प्रत्येक सर्व्हिस सेंटरमध्ये दिवसाला किमान १० ते १२ गाड्या धुलाईसह सर्व्हिसिंगसाठी येतात. सर्व्हिस सेंटरमध्ये पाईपने आणि प्रेशरने दोन प्रकारे वाहने धुतली जातात. पाईपने वाहन धुण्यासाठी साधारण १० ते २० लीटर तर प्रेशरने वाहन धुण्यासाठी किमान चार लिटर पाणी लागते, अशी माहिती सर्व्हिस सेंटर मालकांनी दिली.