ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि.मी. व्यासाची झडप (व्हॉल्व) नादुरुस्त झाल्याने या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सदर झडप तातडीने बदलणे आवश्यक असल्याने नवीन झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
१२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
या कामासाठी शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेचा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
कोणत्या भागांना फटका?
या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन परिसर तसेच मुंब्रा व कळव्याचा काही भाग येथे पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
पाणी टंचाईमुळे ठाण्यात पाण्याचा काळाबाजार; दुप्पट-तिप्पट दराने विक्री
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे गेली आहे. स्वमालकीचे धरण नसल्यामुळे पालिकेला विविध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईमुळे ठाणेकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. त्यातच शहरात महापालिकेचे टँकर अपुरे पडत असल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. काही खासगी टँकरचालकांनी तिप्पट दर आकारून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. गृहसंकुलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. महापालिकेकडून टंचाईग्रस्त भागांत विनामूल्य टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दिवसाला एकच टँकर उपलब्ध होत असल्याने तो अपुरा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडे वळावे लागत आहे.