Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर 
ठाणे

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

येऊरमधील आश्रम रोडवरील लायन पार्क परिसरातील सुरेश गडा यांच्या बंगल्यावर ३१ ऑक्टोबरच्या रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘हॅलोविन पार्टी’वर वर्तकनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली.

Swapnil S

ठाणे : येऊरमधील आश्रम रोडवरील लायन पार्क परिसरातील सुरेश गडा यांच्या बंगल्यावर ३१ ऑक्टोबरच्या रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘हॅलोविन पार्टी’वर वर्तकनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या पार्टीत ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. पार्टीत मोठ्या प्रमाणावर मद्यपान तसेच प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस आणि वनविभागाकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती १,५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे वर्तकनगर पोलीस आणि संबंधित पथकाने रात्री उशिरा बंगल्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

या पार्टीत काही अल्पवयीन मुला-मुलींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. बंगल्याचे मालक सुरेश गडा आणि पार्टीच्या आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लाच?

या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. पार्टीच्या आयोजकाने येऊर प्रवेशद्वारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सहा हजार रुपयांची लाच देऊन नियम धाब्यावर बसवत वाहनांना आत प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे.

येऊरमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

येऊरचा जंगल परिसर आणि निवासी भागात रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्ट्या, डीजेचा आवाज तसेच हुक्का पार्लरच्या तक्रारींमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. आता हॅलोविन पार्टीवरील पोलिसांच्या कारवाईमुळे येथील शांतता, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस आणि वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मद्यपान, ई-सिगारेटचा वापर आणि लाच दिल्याच्या आरोपांबाबत तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण