ठाणे : कळव्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना, ठाणे गुन्हे शाखेने मुंब्रा, खर्डी गाव रोड येथील युसुफ नुरइस्लाम शेख (२८) आणि मुंब्रा, ठाकूर पाड्यातील मारूक नासीर शेख (३०) या अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. तसेच चौकशीत त्या दोघांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याने ते गुन्हे उघडकीस आले असून त्या गुन्ह्यातील ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ७ लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. युसूफ याच्यावर ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच मारूक याच्यावर नवी मुंबईत चार आणि मुंबईत दोन गुन्हे
दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळवा त्रिवेणी संगम सोसायटीत राहणाऱ्या सुहासिनी विचारे यांचे घर २७ ते २८ मार्चदरम्यान बंद होते. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाली होती. याचदरम्यान चोरट्यांनी घरातून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ६० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना, त्या दोघांची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, चोरलेल्या मुद्देमालापैकी ३ लाख २ हजारांचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी देत, त्या गुन्ह्यामध्ये चोरलेल्या मुद्देमालापैकी २ लाख १६ हजारांचे सोन्याचे दागिने आणि ८० हजारांचा निकॉन कंपनीचा कॅमेरा आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा तिन्ही गुन्ह्यातील एकूण ६ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.