ठाणे

गुवाहाटी दौऱ्याच्या 'रील'ने शिवसेनेत खळबळ; नगरसेवकांना गोपाळ लांडगेंची तंबी

तब्बल ६५ लाख रुपयांच्या खर्चामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्याची सोशल मीडियावरील ‘रील’ आता शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. विमान प्रवासापासून दौऱ्यातील विविध क्षणांचे व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली.

Swapnil S

उल्हासनगर : तब्बल ६५ लाख रुपयांच्या खर्चामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्याची सोशल मीडियावरील ‘रील’ आता शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. विमान प्रवासापासून दौऱ्यातील विविध क्षणांचे व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची दखल घेत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे.

उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना नगरसेवकांच्या गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्यासाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याने हा दौरा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. निधीअभावी शहरातील विविध विकासकामे रखडली असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश व शैक्षणिक साहित्य तसेच पाणीपुरवठ्यासारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप होत आहे.

त्यातच गुवाहाटी दौऱ्यातील विमान प्रवास आणि विविध ठिकाणचे व्हिडीओ काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्याने नागरिकांच्या नाराजीला आणखी तोंड फुटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दौऱ्यावर आक्षेप घेत दौऱ्याचा खर्च संबंधित नगरसेवकांकडून वसूल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

खासदार डॉ. शिंदेंची नाराजी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी महापालिकेत नगरसेवकांची बैठक घेतली. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या रील प्रसारित करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नगरसेवकांना त्यांनी खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. पक्षाची प्रतिमा आणि जनमानसातील विश्वासाला धक्का पोहोचेल, असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत. सोशल मीडियाचा वापर करताना नगरसेवकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, अशी सक्त तंबीही लांडगे यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे गुवाहाटी दौऱ्यावरून सुरू झालेला वाद आता शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीपर्यंत पोहोचला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नगरसेवकांना मिळणार अद्ययावत टॅब; मुंबई महापालिका सभागृहाचा कारभार डिजिटल

विवाहपूर्व तपासणीसाठी पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे मोर्चा; लोणावळ्यातील लोहगड हत्याकांडानंतर सखोल चौकशीवर भर

Panvel-Karjat Suburban Corridor : वर्षाअखेरीस सुरक्षा तपासणी; पावसाळ्यातही एमआरव्हीसीच्या प्रकल्पांना वेग

पाणीचोरी वाढली! मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला; दीड वर्षात सहा हजार अनधिकृत नळजोडण्या 

Maharashtra Rain : गुरुवारनंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढणार!