उल्हासनगर : डिस्चार्जनंतर अवघ्या काही तासांतच रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील क्रिटीकेअर रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. उपचारात निष्काळजीपणा आणि दिशाभूल केल्याचा आरोप करून रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप उसळला असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील क्रिटीकेअर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून लालमन गुप्ता हे उपचार घेत होते. शनिवारी त्यांची तब्बेत बरी असल्याचे सांगत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी परतल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली.
रुग्णालय प्रशासनाने उपचारादरम्यान निष्काळजीपणा केला तसेच खऱ्या परिस्थितीबाबत नातेवाईकांची दिशाभूल केली, असा आरोप करत संतप्त जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. अचानक उफाळलेल्या या गोंधळामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.