मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन थांबली; मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू

मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईच्या वाहतुकीचा वेग रोखून धरला आहे. गेले ३ दिवस पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवर झाल्याचे समजते.
मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन थांबली; मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू
Published on

मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईच्या वाहतुकीचा वेग रोखून धरला आहे. गेले ३ दिवस पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवर झाल्याचे समजते. मंगळवारी सकाळपासून उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून दुपारपर्यंत अनेक गाड्या पूर्णपणे बंद पडल्या. रुळावर साचलेल्या पाण्यामुळे हार्बर लाईनची सेवा ठप्प झाली, तर मध्य रेल्वेवरील कुर्ला-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या. अचानक रेल्वे थांबल्याने प्रवाशांना स्थानकांवरच अडकून पडावे लागले, तर काहींना पायी चालत प्रवास करावा लागला.

रुळ पाण्याखाली, अनेक गाड्या रद्द

रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी सकाळी स्पष्ट दिसू लागला. घाटकोपर, शीव, कुर्ला, दादर, भांडुप आणि मानखुर्द या महत्त्वाच्या स्थानकांवर पाणी साचल्याने रेल्वेची गती मंदावली. सकाळी लोकल वेळेवर धावत असली तरी त्या सुमारे अर्धा ते एक तास उशिराने धावत होत्या. परंतु, पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर रुळच पाण्याखाली गेल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून अनेक गाड्या रद्द केल्या.

पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरू असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले, मात्र ती देखील संथ गतीने धावत होती. अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी वगळता बहुतांश नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. शासनानेही सुट्टी जाहीर केल्यामुळे कार्यालयीन गर्दी कमी होती. अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला.

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पायपीट करावी लागली, लोकल बंद झाल्याने त्रस्त झालेले प्रवासी त्रास सहन करताना दिसले. शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल थांबल्याने मुंबई जवळजवळ ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in