उल्हासनगर : अत्यंत कमी वजनाच्या नवजात बालिकेला आवश्यक असलेली नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) आणि व्हेंटिलेटर सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने तिची जीवनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या हृदयद्रावक घटनेमुळे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या असून, एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका सुचित्रा सुधीर सिंग यांनी मंगळवारी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, नाजीरा धिरेंद्र राजभर यांच्या नवजात कन्येचा जन्म अत्यंत कमी वजनासह झाला होता. जन्मानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) आणि व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता होती. मात्र, उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्याने बालिकेवर आवश्यक उपचार करता आले नाहीत.
मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी कळवा, सायन, वाडिया तसेच मुंबई परिसरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने अखेर त्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नगरसेविका सुचित्रा सिंग यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य विभाग, उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून रुग्णालयात तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) सुरू करण्याची मागणी केली आहे.
शहापूर, कसारा, कर्जत, मुरबाड, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील हजारो गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आधारकेंद्र असूनही येथे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. एका चिमुकलीचा मृत्यू ही केवळ आकडेवारी नसून आरोग्य व्यवस्थेतील उणिवांची वेदनादायी जाणीव असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) आणि व्हेंटिलेटर सुविधा नसल्यामुळे एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला, ही अत्यंत वेदनादायी आणि गंभीर बाब आहे. भविष्यात कोणत्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी तातडीने अत्याधुनिक NICU विभाग सुरू करण्यात यावा.सुचित्रा सुधीर सिंग (भाजप नगरसेविका)
मध्यवर्ती रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) सुरू करण्यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करत आहोत. संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. रुग्णांना अधिक दर्जेदार आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक प्रयत्न करत आहे.डॉ. मनोहर बनसोडे (अधीक्षक, मध्यवर्ती रुग्णालय)