उल्हासनगरातील २२८३ लाडक्या बहिणींना मोठा धक्का; अपात्र आकड्यात वाढ होण्याची शक्यता 
ठाणे

उल्हासनगरातील २२८३ लाडक्या बहिणींना मोठा धक्का; अपात्र आकड्यात वाढ होण्याची शक्यता

लाडकी बहीणयोजनेतून उल्हासनगरातील तब्बल २२८३ महिलांचा लाभ रद्द झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पात्र-अपात्रतेबाबत निर्माण झालेला गोंधळ, ई-केवायसीतील तांत्रिक अडथळे आणि खात्यातील पैसे थांबणे, यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

Swapnil S

उल्हासनगर : लाडकी बहीणयोजनेतून उल्हासनगरातील तब्बल २२८३ महिलांचा लाभ रद्द झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पात्र-अपात्रतेबाबत निर्माण झालेला गोंधळ, ई-केवायसीतील तांत्रिक अडथळे आणि खात्यातील पैसे थांबणे, यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, अपात्र महिलांच्या आकड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा समोर आला की, योजनेच्या पात्रतेच्या तपासणीत प्रथम ८६६० महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र पुनर्निरीक्षणानंतर ५८६४ महिलांना पुन्हा पात्र घोषित करून शासनाला अहवाल पाठविण्यात आला, तर २२८३ महिलांचा लाभ कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. यामध्ये २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला, दोनपेक्षा जास्त महिलांची नावे असलेले राशनकार्ड धारक, तसेच संपर्कविहीन लाभार्थी यांचा समावेश आहे. या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरमाणी, प्रशांत पाटील, अर्चना करणकाळे, टोनी शिरवानी, डॉ. एस. बी. सिंग, संजय सिंह, हेमा पिंजानी, अमर लुंड, महादेव बगाडे, मंगला चांडा, उमेश सोनार तसेच महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

८६६० लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी

उल्हासनगर शहरातील महिलांना दिलासा देणारी ही योजना मागील काही महिन्यांपासून अडचणीत सापडली होती. अनेक महिलांच्या खात्यात पैसे न येणे, ई-केवायसी प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, तसेच पात्र-अपात्रतेची स्पष्ट माहिती न मिळणे यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी यांनी शुक्रवारी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि नगरसेवकांची विशेष बैठक घेतली.

उल्हासनगरातील २२८३ लाडक्या बहिणींना मोठा धक्का; अपात्र आकड्यात वाढ होण्याची शक्यता

तांत्रिक अडथळ्यांवरून खडाजंगी

बैठकीत आमदार आयलानी यांनी थेट सीपीडीओ विजय तावडे यांना विचारले की ई-केवायसी वेबसाइट वारंवार बंद का पडते. त्यावर तावडे यांनी सांगितले की, ही समस्या आधार कार्डच्या केंद्रीय पोर्टलशी संबंधित असून ती लवकरच सोडवली जाईल. नगरसेवकांनी निदर्शनास आणले की शहरातील जवळपास ५० टक्के महिलांना योजनेबाबत योग्य माहिती मिळालेली नाही. यावर आमदारांनी प्रशासनाला जनजागृती मोहीम राबवण्याचे तसेच पात्र व अपात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.

लाडकी बहीण योजना ही आपल्या शहरातील महिलांसाठी दिलासा देणारी योजना आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना लाभ मिळणे थांबले आणि त्यांचा संभ्रम वाढला. २२८३ महिलांचा लाभ रद्द झाल्याने आम्हालाही वेदना होत आहेत. कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये, हीच माझी भूमिका आहे. मी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत, की सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करावे आणि पात्र महिलांना तत्काळ लाभ मिळवून द्यावा. या योजनेबाबत शहरात जनजागृती वाढवून पारदर्शकता ठेवली जाईल. उल्हासनगरातील प्रत्येक लाडकी बहीण हक्काचा लाभ मिळवेल, याची मी पूर्ण हमी देतो.
कुमार आयलानी, आमदार

लाडकी बहीण तांत्रिक अडचणीत अडकली

मुरूड-जंजिरा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. या योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि खरंच गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांना आता या प्रक्रियेत मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वापरकर्त्यांना वारंवार "त्रुटी, आम्हाला जास्त ट्रॅफिक येत आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा" असा संदेश मिळत असल्याने अनेक लाभार्थी निराश होत आहेत. ग्रामीण भागातील महिला अनेकदा या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजना लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन