उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प-४ मधील प्रसिद्ध पटेल मार्ट सुपरमार्केटमध्ये जीएसटीचे नवे दर लागू न करता जुन्याच हिशोबाने ग्राहकांकडून बिल वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला. माजी नगरसेवक प्रशांत धांडे यांनी नागरिकांसह सुपरमार्केटला भेट देऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यांच्या आक्षेपामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपाने दुकान काही तासांसाठी बंद करण्यात आले.
मंगळवारी सकाळी व्हिनस चौक ते लालचक्की चौक मार्गावरील पटेल मार्टमध्ये नव्या जीएसटी दरांचे अपडेट बिलिंग सिस्टीममध्ये न करता जुन्या दरांनुसार ग्राहकांकडून जास्त रक्कम वसूल होत असल्याचे लक्षात आले.
माजी नगरसेवक धांडे यांनी तात्काळ समाजसेवक व ग्राहकांसह व्यवस्थापनाला जबाबदारीची मागणी केली. ग्राहकांनीही एकमुखाने व्यवस्थापनावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले, ज्यामुळे दुकानात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुपरमार्केट प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले की, “बिलिंग सिस्टीममध्ये जीएसटीचे नवीन अपडेट अद्याप लागू झालेले नाही, पण अपडेट आल्यानंतर ग्राहकांना योग्य दरांचे बिल दिले जाईल. फसवणुकीचा आमचा हेतू नाही. तरीही नागरिकांनी हे स्पष्टीकरण नाकारले आणि दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली.