उल्हासनगर : उद्यानाचे सौंदर्य वाढविण्याच्या नावाखाली चक्क वृक्षांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमधील स्वामी शांती प्रकाश उद्यान (प्रभात गार्डन) येथील झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर विद्युत तारा गुंडाळून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सुशोभीकरणाच्या या प्रकारामुळे वृक्षांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वामी शांती प्रकाश उद्यानातील सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण शनिवारी उपमहापौर अमर लुंड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्यान अधिक आकर्षक आणि सुंदर दिसावे, यासाठी विविध कामे करण्यात आली आहेत.
मात्र, या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने उद्यानातील झाडांच्या खोडांभोवती आणि फांद्यांवर विद्युत तारांची गुंडाळी करून रोषणाईची व्यवस्था केली आहे. त्यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी वृक्षांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांच्या खोडांभोवती विद्युत तारा घट्ट गुंडाळल्यास वृक्षांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विद्युत तारांमधून निर्माण होणारी उष्णता, तारांचा झाडांच्या सालीशी होणारा सततचा संपर्क आणि विद्युत यंत्रणेतील संभाव्य बिघाड यामुळे वृक्षांचे नुकसान होऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांकडून वृक्षांना हानी पोहोचल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, महापालिकेच्याच उद्यानात वृक्षांच्या खोडांवर विद्युत तारांचा विळखा घालण्यात येत असेल, तर वृक्षसंवर्धनाच्या नियमांचे पालन कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेची भूमिका गुलदसत्त्यात
उद्यानाच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथील वृक्षांचे संवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता राखणेही महापालिकेची जबाबदारी आहे. उपमहापौर अमर लुंड यांची याबाबतची भूमिका काय असेल आणि महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
परवानगी घेतली होती का? कारवाई होणार का?
या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का? संबंधित कामाला मंजुरी कोणी दिली? ठेकेदाराने नियमांचे पालन केले आहे का? तसेच वृक्षांना संभाव्य धोका निर्माण करणारी ही रोषणाई हटविण्यात येणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिका एकीकडे वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करते, तर दुसरीकडे उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी वृक्षांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. झाडांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून उद्यानात स्वतंत्र विद्युत खांब, सुरक्षित प्रकाशयोजना किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करता आली असती. मग झाडांवरच विद्युत रोषणाई करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मनोज कोरडे, पर्यावरणप्रेमी आणि समाजसेवक